Pune Vidhan Sabha Election 2024 : मॉक पोलदरम्यान ५२ मतदान यंत्रे पडली बंद, २८ कंट्रोल युनिट व ४५ व्हीव्हीपॅट पडले बंद
By नितीन चौधरी | Published: November 20, 2024 11:19 AM2024-11-20T11:19:49+5:302024-11-20T11:21:56+5:30
राखीव साठ्यातून बदलले यंत्र प्रत्यक्ष मतदानावेळी एकही यंत्र बंद पडले नाही
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ५.५३ टक्के मतदान झाले आहे. मात्र, तत्पूर्वी यंत्रांची कार्यक्षमता तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या मॉक पोल दरम्यान जिल्ह्यात५२ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र बंद पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यासह २८ कंट्रोल युनिट आणि ४५ व्हीव्हीपॅट बंद पडल्याचे सांगण्यात आले.
प्रत्यक्ष मतदानाला सात वाजता सुरुवात झाली असली तरी त्यापूर्वी साडेपाच वाजता सर्व मतदान केंद्रांवर मॉक पोल घेण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. यादरम्यान सर्व मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रांची कार्यक्षमता पडताळणी करण्यासाठी मॉक पोल केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील ८ हजार ४६२ मतदान केंद्रांवर हे मॉक पोल करण्यात आले.
त्यात ५२ मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम बंद पडल्याचे दिसून आले. राखीव मतदान यंत्रांमधून हे ५२ मतदान यंत्र बदलण्यात आले तसेच २८ कंट्रोल युनिट व ४५ व्हीव्हीपॅट यंत्रही बंद पडल्याचे आढळले. राखीव साठ्यातून हे यंत्र बदलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्वाधिक ७ मतदान यंत्र भोर मतदारसंघात तर इंदापूर मतदारसंघात ६ मतदान यंत्र बंद पडल्याचे सांगण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५ मतदान यंत्र बंद पडले होते. ते तातडीने बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदान सात वाजता सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात अर्थात साडेसात वाजेपर्यंत एकही यंत्र बंद पडले नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.