पुणे - भीमाशंकर व्हाया डेहणे एसटी सुरू झाल्याने ग्रामस्थांत आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:06+5:302021-02-07T04:10:06+5:30
--- डेहणे : पुणे ते भीमाशंकर ही एसटी बस वाडा, डेहणे मार्गे सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ...
---
डेहणे :
पुणे ते भीमाशंकर ही एसटी बस वाडा, डेहणे मार्गे सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. काही वर्षांपूर्वी या मार्गावरील बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्याला यश मिळाले. या बससेवामुळे भीमाशंकरला पुण्यामार्गे येणारे भाविक तसेच पर्यटकांची संख्या यामुळे वाढणार असून प्रवासाची वेळ व अंतरही कमी होणार आहे. बससेवा सुरू झाल्याचा आनंद पेढे वाटून व्यक्त करण्यात आला.
ही बस सकाळी साडेसात वाजता पुणे येथून सुटल्यावर राजगुरुनगरला पावणेनऊ व भीमाशंकर येथे अकरा वाजता पोहोचेल अर्धा तास थांबून परतीचा प्रवास करेल.
यापूर्वी मंगळवेढा आगाराची पंढरपूर-भीमाशंकर ही एकमेव एसटी या मार्गाने धावत होती, परंतु गेल्या सात ते आठ वर्षांपासून ती सेवा बंद करण्यात आली होती. या परिसरातून चाकण औद्योगिक नगरीत जाणारे चाकरमान्यांचे तसेच पुणे येथे जाण्यासाठी थेट बस नसल्याने आदिवासी भागातील प्रवाशांची गैरसयो होत होती.
भीमाशंकर विकास आराखड्यातून भीमाशंकर ते पुणे ही मिनी बससेवा सुरू करण्यासाठी २० मिनी बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बसेस वाडा मार्गे तसेच मंचर मार्गे भीमाशंकरला सोडण्यात येणार आहेत. परंतु लाल फितीत अडकलेल्या या बसेस नागरिकांच्या सेवेत कधी दाखल होणार, हा प्रश्न भाविकांना पडला आहे.
--
कोट १
पुणे- भीमाशंकर एसटी सुरू झाल्याने समाधान आहे परंतु या मार्गावर परतीचा प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी संध्याकाळी दुसरी बस सोडणे आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही प्रस्ताव सादर केला आहे, आराखड्यातून मिळालेल्या बसेस नागरिकांच्या सेवेत लवकर याव्यात यासाठी देवस्थान ट्रस्ट आग्रही आहे.
सुरेश कौदरे, अध्यक्ष भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट.
--
भीमाशंकर आराखड्यातून आलेल्या बसेस कोरोना काळात मुंबईत रुग्णवाहिकेसाठी पाठवल्या आहेत, त्या परत मिळाल्यानंतर भीमाशंकरसाठी प्राधान्याने त्या सोडण्यात येतील.
- रमेश हांडे, आगारप्रमुख , खेड परिवहन आगार.
--
फोटो क्रमांक: ०६ डेहणे बस सुरु
फोटो:- डेहणे येथे पुणे- भीमाशंकर बससेवेचे चालक, वाहक यांचा सत्कार करताना खंडूजी कोरडे, राम हुरसाळे, मनोहर कोरडे, भिकाजी भोकटे,संपत कोरडे, विजय कौदरे.