भक्तांच्या गर्दीने प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 07:00 PM2018-07-23T19:00:57+5:302018-07-23T19:01:05+5:30
कपाळाला चंदनाचा टिळा, मुखात पांडुरंगाचा अखंड नामघोष, मधूनच आकाशातून होणारी पावसाची पखरण अशा वातावरणात आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.
पुणे :
आणीक काही इच्छा, आम्हा नाही चाड
तुझे नाम गोड, पांडुरंग
कपाळाला चंदनाचा टिळा, मुखात पांडुरंगाचा अखंड नामघोष, मधूनच आकाशातून होणारी पावसाची पखरण अशा वातावरणात आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले बघायला मिळाले.
संपूर्ण सिंहगड रस्ता यामुळे गर्दीने फुलून गेला होता. यावेळी वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांची तारांबळ उडालेली बघायला मिळाली. रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लावून भाविक दर्शनासाठी जात होते. यामध्ये आबालवृद्धांसह तरुणांचाही समावेश होता. शहरात सहसा न मिळणाऱ्या गोडीशेवेची दुकानेही दिसत होती.याशिवाय लहान मुलांसाठी खेळण्यांची दुकाने, स्त्रियांसह सौंदर्य प्रसाधनांची दुकानेही दुतर्फ़ा थाटण्यात आली होती.
दुपारपेक्षा संध्याकाळी गर्दीत वाढ होताना दिसून आली. कार्यालयीन वेळ संपल्यावर अनेकांनी दर्शन घेणे पसंत केले. गर्दीमुळे दर्शनाची रांग विठ्ठलवाडी कमानीच्या बाहेरपर्यंत आली होती. दर्शन रांगेतही विठ्ठलाची भजने, अभंग गायले जात होते. मंदिर परिसरात अनेक स्वयंसेवी संस्थांतर्फे साबुदाण्याची खिचडी, राजगिरी लाडू, भारतीय वृक्षांच्या रोपट्याचे वाटप करण्यात येत होते. यावेळी पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. ध्वनिक्षेपकावरून हरवलेल्या आणि गवसलेल्या वस्तूंची माहिती दिली जात होती. चुकलेल्या लहान मुलांचीही नावेही जाहीर करण्यात येत होती.