Pune Wall Collapse : दुर्घटनेची पूर्व कल्पना असूनही दुर्लक्ष; पोलीस तपासात उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 02:00 AM2019-06-30T02:00:00+5:302019-06-30T02:00:02+5:30
पुण्यातील कोंढव्यातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे : अॅल्कॉन लँडमार्कसची संरक्षक भिंत ही कमकुवत असून तिला भेगा पडलेला आहेत, त्यामुळे ती कोसळू शकते, याची कल्पना असूनही बांधकाम व्यावसायिक जगदीशप्रसाद अगरवाल, विवेक सुनिल अगरवाल यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे़.
पुण्यातील कोंढव्यातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामधून हे समोर आले आहे़. अॅल्कॉन लँडमार्कस चे भागीदार जगदीशप्रसाद अगरवाल व इतर ४ जणांनी २०११ मध्ये ही सोसायटी विकसित करण्यास घेतली होती़. ती जानेवारी २०१९ मध्ये इमारत बांधून पूर्ण करण्यात आलेली आहे़. त्यामुळे बांधकामाची तसेच त्याच्या चांगल्या दर्जाची जबाबदारी ही अॅल्कॉन लँडमार्कसच्या भागीदारांवरच येते़. तसेच हे बांधकाम मजूर राहत असलेली जागेमध्ये बांधकाम विकसन करणारे कांचन या संस्थेचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा व रश्मिकांत गांधी हे इमारत उभारत आहेत़. त्यांनी कांचन बिल्डर्सचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर व लेबर कॉंट्रक्टर यांनी बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांची राहण्याची कोणतीही सुरक्षित व्यवस्था केलेली नसल्याचे दिसून आले आहे़. त्यांनी जाणून बुजून हलगर्जीपणा केलेला आहे़ .
अॅल्कॉन लँडमार्कस चे बिल्डर विवेक सुनिल अगरवाल व त्यांचे इतर ४ भागीदार यांना सोसायटीमधील रहिवासी, फ्लॅटधारकांनी इमारतीच्या कम्पाऊंडच्या पडलेल्या भेगा दुरुस्त करणे अथवा मजबूती करण्याच्या दृष्टीने वारंवार लेखी, तोंडी, ई मेलद्वारे तक्रारी केल्या़ तरीही बिल्डरने प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या नाही. त्यामुळे जीवितास धोका निर्माण केला असल्याचे सोसायटी सभासदांनी पोलिसांनी सांगितले आहे़. संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे तसेच बांधकाम मजुर राहत असलेल्या सर्व्हे नंबर १८ मधील जागेमध्ये बांधकाम करणाऱ्या कांचन संस्थेचे भागीदार पंकज व्होरा व त्यांच्या इतर भागीदारांनी मजुरांना असुरक्षित व धोकादायक ठिकाणी राहण्यासाठी तात्पुरते पत्र्याचे खोल्या बांधून दिल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़.