Pune: पुण्याची पाणीकपात तूर्तास टळली, पालिका-पाटबंधारे विभाग करणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 01:03 PM2021-12-04T13:03:44+5:302021-12-04T13:06:28+5:30
पुणे : जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून शुक्रवारपासून (दि. ३) पुण्याचा पाणीपुरवठा कमी करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने तूर्त स्थगित केला ...
पुणे : जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून शुक्रवारपासून (दि. ३) पुण्याचा पाणीपुरवठा कमी करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने तूर्त स्थगित केला आहे. या संदर्भातील जलसंपदा विभागाने महापालिकेशी केलेला पत्रव्यवहार जाहीर झाल्यानंतर पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याशी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ३) पाणीकपातीबाबत चर्चा केली. पाणीकपात केल्यास सध्याच्या परिस्थितीत शहरातील सर्व भागाला पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
महापालिका शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळती कमी करणे, पाणी बचत करणे आदी उपाययोजना करण्याबरोबरच ‘२४ बाय ७’ समान पाणीपुरवठा योजना जलदगतीने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी महापालिकेने स्पष्ट केले. शहरातील वाढलेली एकूण लोकसंख्या आणि नव्याने समाविष्ट झालेली २३ गावे यांचा विचार करता, तूर्तास खडकवासला धरणातून पाणीकपात करू नये, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली. त्यानुसार आजपासून पोलीस बंदोबस्तात सुरू होणारी पाणीकपात तूर्तास थांबविण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या सोमवारी (दि.६) महापालिका आयुक्त व पाटबंधारे विभाग यांच्यात पाणीकपातीबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.