Pune Water Supply: पुणे शहरातील पाणी कपात रद्द; सोमवारपासून नियमित पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 02:00 PM2022-07-10T14:00:39+5:302022-07-10T14:00:53+5:30
पाणी साठा कमी झाल्याने पुणे महापालिकेने ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते
पुणे : पुणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील आजमितीला असलेला पाणी साठा विचारात घेता, शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. २६ जुलै पर्यंत ही पाणीकपात रद्द करण्यात आली असून, २६ जुलैचा पाणीसाठा विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी याबाबत माहिती दिली.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामधील पाणी साठा कमी झाल्याने पुणे महापालिकेने ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते. तद्नंतर १० तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि बकरी ईद विचारात घेता ८ ते ११ जुलै पर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमितपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आजमितीस चारही धरणामधील पाणीसाठा विचारात घेता ११ जुलै पासून दिनांक २६ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. शहरात ४ जुलै पासून गुरुवारपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु नियोजनानुसार ज्या दिवशी पाणीपुरवठा होणार होता त्या भागातही उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. तर पाणी थोड्याच वेळ आल्याने शेकडो सदनिका असलेल्या सोसायट्यांना टँकरचा आधार घ्यावा लागला. परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहरावरील पाणी कपात पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता आहे.