पुणे पाण्यात; पालिकेचे वरातीमागून घोडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 12:26 PM2019-11-05T12:26:01+5:302019-11-05T12:41:08+5:30
शहराला पावसाचा तडाखा : पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरच पालिकेने केलेल्या पावसाळापूर्व कामाचे पितळ उघडे पडले.
पुणे : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने शहराला चांगलाच तडाखा दिला आहे. तासभर पाऊस पडला तरी रस्त्यांना नदीचे स्वरूप येऊ लागले आहे. अपुऱ्या क्षमतेच्या ड्रेनेज लाइन्स, पावसाळी गटारांची न झालेली स्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे आणि पाणी वाहून जाण्याचे अडविलेले नैसर्गिक प्रवाह यामुळे जागोजाग ‘वॉटर लॉगिंग’ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांमधून प्रक्षोभ व्यक्त होऊ लागल्यावर आणि पाच वेळा पुणे पाण्यात गेल्यावर पालिका प्रशासनाला जाग आली असून, या ‘वॉटर लॉगिंग’च्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरच पालिकेने केलेल्या पावसाळापूर्व कामाचे पितळ उघडे पडले. गटारांची केलेली स्वच्छता, नाल्यांमधील गाळ काढणे आदी कामांची पोलखोल झाली. कोट्यवधी रुपयांचा मलिदा ठेकेदारांच्या घशात घालणारी पालिकेची यंत्रणा अद्यापही जागी झालेली नाही. आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकजण अद्यापही पुराच्या तडाख्यातून सावरू शकले नाहीत. अनेकांची दिवाळी दु:खात आणि घर सावरण्यातच गेली. प्रशासनाने तत्कालीन आणि अनुषंगिक अशी स्वच्छता, राडारोडा उचलणे, औषधोपचार अशी जुजबी कामे केली. परंतु, मूळ कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला नसल्याचे दिसत आहे.
आंबिल ओढ्याला आलेल्या पुरानंतर आतापर्यंत चार ते पाच वेळा मुसळधार पाऊस झाला असून, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. पूरग्रस्तांच्या घरांमध्ये अद्यापही पाणी घुसण्याचे प्रकार सुरूच आहेत. गेल्याच आठवड्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शहरात पाणी तुंंबले होते. परंतु, अधिकारी आचारसंहितेचे कारण पुढे करीत होते. पालिकेचे अनेक अधिकारी निवडणुकीच्या कामात असल्याचे सांगण्यात येत होते. प्रशासनाने पावसाळापूर्व कामांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला. ठेकेदारांचे खिसे गरम करणारी आणि टक्केवारीवर चालणारी पालिकेची यंत्रणा नागरिकांच्या जिवावर उठल्याचे चित्र आहे.
वारंवार नागरिकांच्या घरांमध्ये आणि रस्त्यावर पाणी कसे साचते याची कारणे काय आहेत यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी पावसावर त्याचे खापर फोडत आहेत. पाऊसच एवढा मोठ्या प्रमाणात पडतोय की सर्व यंत्रणा कोलमडून पडतेय, असे सांगत स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
............
शहरातील पावसाळी वाहिन्या या साधारण पावसाच्या पाण्याच्या अंदाजानुसार टाकण्यात आलेल्या आहेत. अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी आल्याने या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. या वाहिन्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणी साचत असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी गटारांचे चेंबर्स तुंबलेले आहेत.
त्याच्यामध्ये गाळ आणि कचरा आहे. तसेच डेÑनेजचे पाइपही स्वच्छ केलेले नाहीत.
..........
बऱ्याच ठिकाणी नाल्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या बांधकामांवेळी पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी भिंती घालण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी छोटे छोटे पाइप टाक ण्यात आलेले आहेत. त्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार वाढत आहेत. यावर मात्र, प्रशासनाकडून कारवाई होत नाही. बेकायदेशीरपणे प्रवाह बंद करताना अधिकारी
झोपा काढतात की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
.........
सातारा रस्ता-पुष्पमंगल चौक, स. प. महाविद्यालय रस्ता, अलका टॉकीज, झेड ब्रिजसमोर, दत्तनगर भुयारी मार्ग-कात्रज, आरटीओ ते शाहीर अमर शेख चौकादरम्यान, शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर, साधू वासवानी पूल, मोरओढा चौक, साधू वासवानी चौक, अलंकार चौक, मंगलदास ते जहांगीर रुग्णालय, ब्लू डायमंड हॉटेल चौक, नेहरू मेमोरियल, दोराबजी चौक, पौड रस्ता (कोथरुड डेपो ते इंदिराशंकर नगरी), एसएनडीटी ते आठवले चौक, नळस्टॉप चौक, म्हात्रे पूल-रिलायन्स मॉलजवळ, वारजे जंक्शन, दांडेकर पूल, पु. ल. देशपांडे उद्यानासमोर, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, ब्रह्मा चौक, पोल्ट्री चौक रेल्वे अंडरपास- खडकी, चर्च चौक रेल्वे अंडरपास, भाऊ पाटील रस्ता रेल्वे अंडरपास, आळंदी रस्ता जंक्शन-येरवडा, कॉमर्स झोन, सादलबाबा चौक, तारकेश्वर चौक, धानोरी फाटा, गल्ली क्रमांक ७-टिंगरेनगर, डॉ. आंबेडकर चौक, पर्णकुटी, गुंजन चौक, मस्के वस्ती, शिवाजी रस्ता-पाषाण, अभिमानश्री, फिनिक्स मॉल-विमानतळ, चांदारे कॉम्प्लेक्ससमोर, खराडी दर्गा, हडपसर-रविदर्शन, शंकरमठ, मंतरवाडी चौक, कालिका डेअरी-मगरपट्टा, वानवडी-सीडीओ चौक, फातिमानगर चौक, लुल्लानगर चौक, मुंढवा-जहांगीर चौक, वाय जंक्शन चौक.
.......
अतिरिक्त आयुक्तांच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
४तातडीच्या कामांसाठी अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबविणार.
४सर्वेक्षण अहवाल आल्यावर स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवणार.
४पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करणार.
४तातडीच्या कामांमध्ये कलव्हटर््स बांधणे आदी कामांचा समावेश
४परिमंडलनिहाय पाणी साचण्याच्या ठिकाणांची यादी करुन कारणे शोधण्याच्या सूचना
४कारणांबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल देण्याच्या मुख्य अभियंत्यांना सूचना
४20 जेसीबी आणि स्पायडर मशीनच्या साहाय्याने स्वच्छतेच्या सूचना
४शासकीय इमारती आणि जागांवरील पडलेल्या सीमाभिंती पालिका बांधणार