टँकरच्या शुल्कात पाच टक्के वाढ; नागरिकांना उन्हासह दरवाढीची झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:52 IST2025-04-13T12:51:29+5:302025-04-13T12:52:50+5:30

नागरिकांच्या उन्हासह पाण्याच्या टँकरच्या दरवाढीच्या झळा सहन कराव्या लागणार

pune water news Five percent increase in tanker charges; Citizens suffer price hike along with summer | टँकरच्या शुल्कात पाच टक्के वाढ; नागरिकांना उन्हासह दरवाढीची झळ

टँकरच्या शुल्कात पाच टक्के वाढ; नागरिकांना उन्हासह दरवाढीची झळ

पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याच्या टँकरची मागणीही वाढत असतानाच आता महापालिकेने टँकरच्या दरामध्ये गतवर्षीपेक्षा पाच टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या उन्हासह पाण्याच्या टँकरच्या दरवाढीच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल ८७ हजार ८८८ टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मार्च महिन्याचा विचार करता गतवर्षी ३८ हजार २९९ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. त्यात ९ हजार ५९७ टँकरची भर पडून एका महिन्यात ४७ हजार ८९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे महापालिकेकडून खडकवासला धरणासह भामा आसखेड धरणातून पाणी उचलले जाते. ज्या परिसरात कमी पाणीपुरवठा होतो, त्या ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतु:शृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत.

यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी वाढलेली आहे. मागील वर्षी मार्च २०२४ महिन्यात टँकरच्या ३८ हजार २९९ फेऱ्या झाल्या होत्या. त्यात यंदा मार्च २०२५ मध्ये ९ हजार ५९७ वाढ झाली असून, एका महिन्यात ४७ हजार ८९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

दरम्यान, उन्हाच्या झळा आणि टँकरची मागणी वाढत असताना महापालिकेने टँकरच्या दरामध्ये पाच टक्के वाढ केली आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने नागरिकांची लूट करणारे टँकर माफियाही आपल्या दरामध्ये वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हासह टँकरच्या दरवाढीचाही चटका सहन करावा लागणार आहे.

टँकरचे दर

- दहा हजार लिटरपर्यंत - जुना दर ६६६ रुपये - नवीन दर ६९९ रुपये

- दहा हजार ते पंधरा हजार लिटरपर्यंत - जुना दर १०४८ रुपये - नवीन दर ११०१ रुपये

- पंधरा हजार लिटरपेक्षा जास्त - जुना दर १४७८ रुपये - नवीन दर १५५२ रुपये

- महापालिकेचा टँकर असल्यास (नागरिकांसाठी) दहा हजार लिटरपर्यंत - जुना दर ११८२ रुपये - नवीन दर १२४१ रुपये

मार्च महिन्याची आकडेवारी

वर्ष - टँकर संख्या

२०२२-२३ - ३१५६०

२०२३-२४ - ३८२९९

२०२४-२५ - ४७८९६

टँकर माफियांकडून लूट

महापालिकेचे सुमारे साडेपाचशे टँकर असून, खासगी दोनशे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. साधारणपणे उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची मागणी वाढते. यंदाही उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याच्या टँकरची संख्या वाढलेली आहे. महापालिकेच्या टँकर पाॅइंटवर ६९९ रुपये पास काढून भरलेला टँकर किती किमतीमध्ये विक्री करावा, यावर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्यामुळे एक टँकर दीड ते दोन हजारांमध्ये विकला जातो. त्यामुळे टँकर माफियांची लॉबी तयार झाली असून, त्यांच्याकडून गरजू नागरिकांची लूट केली जाते. 

Web Title: pune water news Five percent increase in tanker charges; Citizens suffer price hike along with summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.