पुणेकरांना आता २४ तास पाणीपुरवठा; येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:52 AM2018-02-13T03:52:28+5:302018-02-13T03:52:44+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेला अखेर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइन, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेंटेनन्सच्या कामाच्या सहापैकी पाच कामे एलअँडटीला तर एक काम जैन एरिगेशनला देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेला अखेर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइन, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेंटेनन्सच्या कामाच्या सहापैकी पाच कामे एलअँडटीला तर एक काम जैन एरिगेशनला देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. येत्या १५ दिवसांत योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातदेखील होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरासाठीची बहुचर्चित २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवºयात सापडली आहे. तब्बल २ हजार ६०० कोटींची या योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदा तब्बल २६ टक्के जादा दराने आल्या. यामुळे योजनेचा खर्च ३ हजार १०० कोटीपर्यंत गेला. या निविदांना विरोध झाल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्यास सांगितले. मूल्यवर्धित कराच्या आकारणीनंतर नव्याने पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले. यामध्येसुद्धा फुगवटा केला जात असल्याचे समोर आल्यानंतर वाद झाला होता. अखेर नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीनंतर अखेर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निविदा प्रक्रियेला मान्यता देण्यात आली. यामुळे आता चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एलअॅण्डटी कंपनीला सहा निविदा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर चौथ्या क्रमांकाची निविदा जैन एरिगेशन कंपनीला देण्याच्या उपसूचनेसह प्रस्ताव मान्य करण्यात आला. चोवीस तास पाणी
योजनेमध्ये पाइपलाइन टाकणे, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेंटेनन्स असे सहा भाग करण्यात
आले आहेत. महापालिका
प्रशासनाने यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. सुमारे २३१५ कोटींचा हा प्रकल्प असून, २०५० कोटींच्या निविदा प्रशासनाला मिळाल्या
आहेत. सरासरी १० ते १२ टक्के
कमी दराने कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. सहाही भागांत एलअॅण्डटी कंपनीने कमी दराच्या निविदा
आल्या आहेत.
याविषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, की चोवीस तास पाणीपुरवठा योजना ही शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना आहे. पाणी बचतीसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. संपूर्ण शहरामध्ये ही योजना झाल्यास पुणे हे देशातील एकमेव शहर असेल. आपण सध्याचा विचार केल्यास ३५० लिटर प्रतिमाणसी पाण्याचा वापर करतो, असे असताना असमान पाणी शहरामध्ये मिळत आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य मोजमाप होण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. यामुळे पाण्याची गळती रोखण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पाची मुदत ५ वर्षे : प्रायोगिक आराखडा तयार
महापालिकेने २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेसाठी प्रायोगिक आराखडा तयार केला होता. यामध्ये शहरामधील पाच भाग निवडण्यात आले होते. कात्रज, सहकारनगर, येरवडा, तळजाई अशा भागांचा यामध्ये समावेश आहे. सुरुवातीला या ठिकाणी काम सुरू करण्यात येईल. त्याबरोबर शहरामध्येसुद्धा काम सुरू करण्यात येणार आहे.
सुरुवातीला व्यावसायिक वापर होत असलेल्या मिळकतींना मीटर बसवण्यात येणार आहेत. यानंतर निवासी भागाला मीटर बसवण्यात येतील. योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहराचे ३२८ भाग करण्यात आले आहेत.
या भागांमध्ये टाक्या आणि मोठे मीटर बसवण्यात येईल. प्रकल्पाची मुदत पाच वर्षे असून तीन वर्षांमध्ये काम पूर्ण होईल अशी अपेक्षा
आहे, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
१४०० किलोमीटर
रस्ते योजनेसाठी खोदणार
पुणे शहरामध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असल्यामुळे विविध प्रकारच्या पाइपलाइन टाकण्यासाठी सुमारे १ हजार ४०० किलोमीटरचे रस्ते खोदावे लागणार आहेत.
त्यामुळे महापालिकेकडून नव्याने तयार करण्यात आलेले सिमेंटचे रस्ते खोदण्याची वेळ येणार आहे. रस्ते खोदल्यानंतर त्याचा जोखमीचा कालावधी नष्ट होईल. परिणामी महापालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी मोठा निधी उभारावा लागेल.
आश्वासने पाळली
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन पाळले आहे. पुणेकरांसाठी पारदर्शक पद्धतीने चोवीस तास पाणीपुरवठा योजना आणली आहे. शहराच्या दृष्टीने ही महत्त्वाकांक्षी योजना असून लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
- मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष
देशातील २४ बाय ७ पाणीपुरवठा करणारे पहिले शहर
संपूर्ण शहरामध्ये २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी झाल्यास पुणे हे देशातील पहिले शहर असेल. पुणे शहरामध्ये सर्वांत कमी दराने निविदा मिळाल्या आहेत. ही योजना भविष्याचा विचार करूनच आणण्यात आली असून, यामुळे तब्बल ८०० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे.
- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त