Pune: कुकडीच्या पाण्यासाठी संघर्ष करण्यास आम्ही तयार; दिलीप वळसे-पाटील यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:45 PM2023-06-24T12:45:20+5:302023-06-24T12:46:48+5:30
नारायणगाव येथील पाटबंधारे विभागाला निवेदन...
नारायणगाव (पुणे) : जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील धरणातील पाणी केटीवेअर द्वारे देण्याचा निर्णय रद्द करून कालव्याद्वारे पाणी देण्याचा सरकारचा निर्णय हा शेतकरी वर्गात प्रक्षोभ करणारा आहे. कुकडी प्रकल्पातील धरणाच्या पाणीवाटप धोरणात बदल न केल्यास आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार आहोत, असा इशारा माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी नारायणगाव येथे दिला.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यासाठी पोलिस बंदोबस्तात आवर्तन कालावधी तीन दिवसांनी वाढवण्याचा आदेश कालवा सल्लागार समितीचे सदस्य सचिव सं. मा. सांगळे यांनी गुरुवारी ( दि. २२ ) काढल्याने या निर्णयाचा विरोध करण्यासाठी माजी गृहमंत्री तथा आंबेगावचे आ. दिलीप वळसे-पाटील, आ. अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांनी नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे उप कार्यकारी अभियंता आर. बी. रावळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, अंकुश आम्ले, बाळासाहेब खिल्लारी, बबनराव तांबे, गुलाबशेठ नेहेरकर, बाजीराव ढोले, गणपत कवडे, विकास दरेकर, तानाजी बेनके, पापाशेठ खोत, गणेश वाजगे, प्रदीप थोरवे, यद्नेश औटी, अतुल भांबेरे, बाळासाहेब औटी, संभाजी चव्हाण, शेतकरी संघटनेचे सचिन थोरवे आदी उपस्थित होते .
वळसे-पाटील म्हणाले की, दोन तालुक्यांतील ६५ केटीवेअर द्वारे देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता, तो निर्णय स्थगित केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रक्षोभ झाला आहे. भविष्यात पाणी प्रश्नासाठी संघर्ष करायला आम्ही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाण्यासाठी अंगावर गोळ्या झेलण्यास तयार: अतुल बेनके
कुकडी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असताना नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा (जि. नगर) तालुक्यासाठी पोलिस बंदोबस्तात आवर्तन कालावधी तीन दिवसांनी वाढवण्याचा आदेश अन्यायकारक असून, या आदेशाचा निषेध व्यक्त करीत आहोत, पाण्यासाठी अंगावर गोळ्या झेलण्यास आम्ही तयार आहोत, असा इशारा जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राज्य शासनाला दिला आहे.
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता श्रीगोंदा तालुक्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार प्रथमच पोलिस बंदोबस्तात येडगाव धरणातून पाणी सोडण्याच्या या निर्णयाचा निषेध करीत प्रथमच अतिरिक्त ३ दिवसांच्या आवर्तनासाठी पोलिस दलाचे सहकार्य घेण्याची सूचना सांगळे यांनी दिलेल्या आदेशात केल्याने याचा तीव्र संताप व्यक्त करून आ. बेनके म्हणाले की, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिरिक्त ३ दिवसांचे आवर्तन वाढविण्यास आमचा विरोध असून, काढलेला आदेश आजच्या आज रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू.
पूर्वकल्पना देऊनही कार्यकारी अभियंता गैरहजर
अतिरिक्त आवर्तन देऊ नये याचे निवेदन देण्यासाठी माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार अतुल बेनके हे पाटबंधारे विभाग कार्यालयात एक वाजता येणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. दोन्ही नेते १२.४५ वा. कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ या कार्यालयात पोहोचले. मात्र, कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर अनुपस्थित होते. अर्धा तास अधिक वेळ वाट पाहून ते न आल्याने अखेर उपमुख्य कार्यकारी अभियंता रावळे यांना निवेदन देण्यात आले. पूर्वकल्पना देऊनही कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर अनुपस्थित राहिल्याने त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून उपस्थित न राहण्याच्या सूचना होत्या की त्यांनी जाणीवपूर्वक येण्याचे टाळले याबाबत उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.