Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 08:33 PM2023-06-08T20:33:54+5:302023-06-08T20:34:28+5:30
महाविकास आघाडी किंवा भाजपच्या उमेदवाराला मात देऊन विजय मिळू शकतो, वसंत मोरेंचा विश्वास
पुणे: शहर लोकसभेची निवडणूक लढेल व जिंकेलही, पोटनिवडणूक असो किंवा नेहमीची निवडणूक, आमची हक्काची मते या मतदारसंघात आहेत असा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला. राज ठाकरे यांचा आदेश असेल तर आपण कधीही तयार आहोत असे ते म्हणाले.
मोरे मनसेचे शहराध्यक्ष होते. राज यांच्या मशिदीवरील भोंगे काढून टाकण्याच्या आंदोलनाच्या विरोधी मत जाहीरपणे व्यक्त केल्याने त्या पदावरून त्यांना दूर करण्यात आले. मनसेच्याच काही पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचे मतभेद आहेत. हे मतभेद आहेत, मनभेद नाहीत. राज ठाकरे यांचा आदेश आला की सगळेच एकदिलाने काम करतील, सध्याची या मतदारसंघातील राजकीय स्थिती मनसेला अनुकूल आहे असा दावाही मोरे यांनी केला. सगळ्या राजकीय पक्षांना लोक आता विटले आहेत. काँग्रेस सह भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात शहरात तीव्र नाराजी आहे. मनसेच काही करू शकते असा विश्वास मतदारांच्या मनात आहे असे मोरे म्हणाले,
महापालिकेत मनसेचे २९ नगरसेवक होते. त्यानंतरच्या निवडणूकीत ४ चा प्रभाग झाला, त्यामुळे मनसेला फटका बसला, मात्र आमची मते कायम आहेत. ती मते, मागील काळात नगरसेवक म्हणून केलेली कामे या जोरावर मनसेला या मतदारसंघात विजय मिळू शकतो. आमच्यासाठी ही महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी असेल असे मोरे यांनी सांगितले. काँग्रेसची अवस्था बिकट आहे, शिवसेनेत फूट पडली आहे, जनमत फार झपाट्याने भाजपच्या विरोधात चालले आहे या सगळ्याचा राजकीय फायदा मनसेला नक्की मिळेल व महाविकास आघाडी किंवा भाजपच्या उमेदवाराला मात देऊन विजय मिळू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.