पुण्यात दिवसाही थंडी जाणवणार; तापमान गेले १२ अंशावर
By श्रीकिशन काळे | Published: January 2, 2024 04:05 PM2024-01-02T16:05:38+5:302024-01-02T16:06:17+5:30
५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होईल
पुणे : राज्यात आर्द्रता व ढगाळ वातावरणामुळे दिवसा थंडी जाणवणार आहे. तर पुढील ७२ तासांत आकाश ढगाळ राहणार असून, पहाटे धुके पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पुणे शहरातील किमान तापमान २ अंश सेल्सिअसने वाढले आहे.
सध्या दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर ठळक दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. त्याची वाटचाल उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात ५ जानेवारीनंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात ६ जानेवारीनंतर तुरळक ठिकाणी अतिहलक्या पावसाची शक्यता आहे. ५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होईल. त्यानंतर मात्र घट होईल.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदवले जात होते. ते आता १२ अंशावर गेले आहे. तरी देखील हवेतील गारठा अजूनही जाणवत असून, ढगाळ वातावरण आणि हवेतील आर्द्रतेमुळे दिवसभर गारठा आहे. शिवाजीनगरमध्ये किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
शहरातील किमान तापमान
पाषाण : १२.२
हवेली : १२.३
एनडीए : १२.६
शिवाजीनगर : १३.६
कोरेगाव पार्क : १७.५
मगरपट्टा : १८.०
वडगावशेरी १९.२