पुणे पॅटर्न राबवून मोक्का अंतर्गत शिक्षेसाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:10 AM2021-03-25T04:10:37+5:302021-03-25T04:10:37+5:30

--- लोणी काळभोर : संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) ...

Pune will follow the pattern for punishment under Mocca | पुणे पॅटर्न राबवून मोक्का अंतर्गत शिक्षेसाठी पाठपुरावा करणार

पुणे पॅटर्न राबवून मोक्का अंतर्गत शिक्षेसाठी पाठपुरावा करणार

Next

---

लोणी काळभोर : संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) शहरात पुणे पोलीसांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर यापूर्वीच कारवाई केली आहे. बहुतांश टोळ्यांवर प्रभावीपणे मोक्का लावल्यामुळे संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे. याचप्रमाणे आगामी काळांत लोणी काळभोर व लोणी कंद पोलीस ठाण्याचे हद्दीतील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहावा याकरिता पुणे पॅटर्न राबवून मोक्काअंतर्गत शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी केले.

लोणी काळभोर व लोणी कंद ही ग्रामीण भागातील पोलीस ठाणी शहर पोलीस आयुक्तालयास जोडण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीची पाहणी करण्यासाठी गुप्ता आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त रवींद्र शिसवे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडल ५ पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर व दगडू हाके उपस्थित होते.

आयुक्त गुप्ता म्हणाले की, बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने दमदार पावले टाकली असून बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश हा कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणाऱ्यास कडक शिक्षेची तरतूद केलेली असून आगामी काळामध्ये ग्रामीण भागात बेकायदा खासगी सावकारकी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. गरज पडली तर तडीपार व मोक्का यांसारख्या गुन्ह्यांची नोंद केली जाईल. यांचबरोबर दारू, मटका, जुगार तसेच वाळूमाफियांसमवेत इतर अवैध धंदे करणारांवरही कठोर कारवाई करण्यात येईल.

--

चौकट

गुन्हे कमी करण्यासाठी लोकसभा महत्त्वाचा पुणे-सोलापूर व पुणे-नगर या दोन्ही महामार्गावरील वाढती वाहतूक त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येसाठी कायदा, सुव्यवस्था सांभाळणे यास आम्ही प्राधान्य देणार आहोत. गुन्हेगारी कमी करायची असेल तर लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. पण लोक तेव्हाच तक्रार करायला पुढे येतात जेव्हा त्यांना खात्री असते की पोलीस कारवाई करतील. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्याअनुषंगाने गुन्हे व इतर प्रशासकीय माहिती घेऊन लवकरात लवकर या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत कशा प्रकारे प्रभावीपणे काम करता येईल यासाठी अधिक मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे गस्त वाढवून गरजेच्या वेळी तत्काळ मदत मिळेल. यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

Web Title: Pune will follow the pattern for punishment under Mocca

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.