पुण्याला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १२० जवानांची एक तुकडी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:49 PM2020-05-13T19:49:54+5:302020-05-13T20:09:30+5:30
लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आणि आगामी रमजान ईद सण जवळ आल्याने पोलिसांच्या मदतीसाठी १२० जवानांची एक तुकडी पुण्यात
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व येणारा रमजान सण लक्षात घेऊन शहर पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची १२० जवानांची एक कंपनी पुणे शहरात येणार आहे.
गेल्या २ महिन्यांपासून लॉकडाऊन काळात पोलीस दल मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तात अडकलेले आहे. राज्यात एक हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे.त्यामुळे मोठ्या संख्येने पोलिसांना क्वारंटाईन करावे लागले आहे. तसेच ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचार्यांना खबरदारी म्हणून रजा देण्यात आली आहे. त्यामुळे उरलेल्या पोलीस दलावर बंदोबस्ताचा मोठा ताण आला आहे. सलग दोन महिन्यांच्या बंदोबस्तामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांची दमवणूक झाली आहे. लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आणि आगामी रमजान ईद सण जवळ आल्याने पोलिसांच्या मदतीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय सशस्त्र दलाच्या २० कंपन्यांची मागणी केंद्राकडे केली आहे.
या कंपन्या आल्यानंतर मुंबईवर राज्यातील विविध शहरांमध्ये त्या तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र दलाच्या १२० जवानांची तुकडी पुणे शहराला मिळणार आहे. पुणे शहरात ६९ ठिकाणी प्रतिबंधितक्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी पुणे पोलिसांना ही तुकडी बंदोबस्तासाठी सहाय्य करेल, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टेयांनी सांगितले.
पुणे शहरात आतापर्यंत १७ पोलीस कर्मचार्यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. त्यामुळे जवळपास १७५ हून अधिक पोलिसांना क्वारंटाईन करावे लागले आहे. तसेच पुण्यातील ५५ वर्षांवरील कर्मचारी व आजारी कर्मचार्यांना रजा देण्यात आली आहे. त्यामुळे उरलेल्या पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आला आहे. त्यामुळे कंटेंमेंट झोन व्यतिरिक्त शहराच्या इतर भागातील बंदोबस्तआता शिथिल करण्यात आला आहे.