पुण्याला साडेअकरा टीएमसी पाण्यातच करावे लागणार नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 02:10 AM2018-12-28T02:10:55+5:302018-12-28T02:11:12+5:30

पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन आता महापालिकेला ११५० दशलक्ष लिटरमध्येच (११.५ टीएमसी) करावे लागणार आहे.

 Pune will have to do it in TMC water | पुण्याला साडेअकरा टीएमसी पाण्यातच करावे लागणार नियोजन

पुण्याला साडेअकरा टीएमसी पाण्यातच करावे लागणार नियोजन

Next

पुणे : शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन आता महापालिकेला ११५० दशलक्ष लिटरमध्येच (११.५ टीएमसी) करावे लागणार आहे. ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेला आदेश तुम्हाला आता पाळावाच लागेल’ असे जलसंपदा विभागाने महापालिकेला गुरुवारी झालेल्या बैठकीत बजावले. ११५० दशलक्ष लिटर पाणीच दररोज मिळणार हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करा असे पालिकेला सांगण्यात आले.
सध्या पालिका १३५० दशलक्ष लिटर पाणी घेत असून, तरीही शहराला पुरेसे पाणी देण्यात अडचणी येत आहेत. आता ११५० दशलक्ष लिटर पाणी मिळाल्यास, संपूर्ण पुणे शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा करण्यात अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ११५० दशलक्ष लिटर पाणी वापरण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय कायम ठेवून त्याप्रमाणे महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी म्हणून सिंचन भवन येथे गुरुवारी ही बैठक झाली.
जलसंपदाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम आदी बैठकीला उपस्थित होते. प्राधिकरणाच्या आदेशावर बैठकीत चर्चा झाली. धरणातील पाण्याचे नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तसेच सरकारने कोटा ठरवून दिला आहे, त्याप्रमाणे महापालिकेने ११५० दशलक्ष लिटर पाणी रोज घेतले पाहिजे; मात्र पालिका दररोज १३५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे असे पालिकेला सांगण्यात आले.
यामुळे महापालिकेचीच अडचण होणार आहे. महापालिकेसाठी साडेअकरा टीएमसी वार्षिक पाणी निश्चित केले आहे. ते पालिकेने जपून वापरले पाहिजे. तसे न करता जास्त पाणी वापरले गेले, तर ऐन उन्हाळ्यात धरणामध्ये महापालिकेच्या वाट्याचे पाणी नसेल. शेतीसाठी व ग्रामीण भागाच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेला त्यांचा साठा त्यांना द्यावा लागेल. तरीही नियोजनामध्ये उन्हाळ्यातील दोनऐवजी एकच आवर्तन ठेवण्यात आले आहे.
त्यामुळे आता महापालिकेने दररोज ११५० दशलक्ष लिटर पाण्याचे नियोजन करावे असे जलसंपदाकडून सांगण्यात आले.

दिवसाआड पाण्याची येणार वेळ : पाणीकपात करावीच लागणार

सध्या मिळणारे १३५० दशलक्ष लिटर पाणीच पुण्याला पुरवताना प्रशासनाची अडचण होत आहे. प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे जलसंपदाने ११.५० टीएमसी वार्षिक पाणी देण्यात आले, तर पुणे शहराला दररोज फक्त ८९२ दशलक्ष लिटरच पाणी मिळेल.
हे पाणी पुरवून वापरायचे तर एक दिवसाआड व तेही फक्त थोडाच वेळ, कमी दाबाने द्यावे लागणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पुणे शहरावर पाण्याच्या कपातीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे.
बैठकीत यावर चर्चा झाली, त्या वेळी जलसंपदाने महापालिकेला पाण्यात काही टक्के कपात जाहीर करावी, असे सांगितले; मात्र हा निर्णय पालकमंत्री, महापौर आदी राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करूनच घ्यावा लागेल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

महापालिका सध्या दररोज १३५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे. ते पुरवून वापरतानाच महापालिकेची दमछाक होत आहे.
शहराच्या काही ठिकाणी पाणी पोहोचतच नाही. विशेषत: पूर्व भागातील उपनगरांना हा त्रास सहन करावा लागतो आहे.
मोठ्या सोसायट्यांमध्ये पाण्याला दाब नसल्यामुळे जमिनीखालील साठवण टाक्यांमध्ये पाणी साठत नाही. त्यामुळे ते पाणी इमारतींमध्ये वर चढवता येत नाही. सलग दोन तासही पाणी येत नसल्यामुळे टँकर मागवून त्यांना पाण्याची गरज भागवावी लागत आहे.

Web Title:  Pune will have to do it in TMC water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.