पुणे जिंकणारच; पण बारामतीही घेऊ, महायुतीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:13 AM2019-04-03T01:13:59+5:302019-04-03T01:14:29+5:30

महायुतीचा निर्धार : बापट, कुल यांचे अर्ज दाखल; कसबा गणपतीची पूजा करून मिरवणूक

Pune win; But take Baramati, the determination of Mahayuti | पुणे जिंकणारच; पण बारामतीही घेऊ, महायुतीचा निर्धार

पुणे जिंकणारच; पण बारामतीही घेऊ, महायुतीचा निर्धार

googlenewsNext

पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपा-शिवसेना महायुतीतर्फे अनुक्रमे गिरीश बापट आणि कांचन कुल यांनी मंगळवारी (दि. २) उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत मिरवणुकीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत हे दोन्ही उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, पुणे-बारामती मतदारसंघातले महायुतीचे आमदार तसेच महायुतीतल्या सर्व पक्षांचे शहराध्यक्ष या वेळी उपस्थित होते.

भाजपा, शिवसेना आणि रिपाइं (आठवले) या पक्षांच्या झेंड्यांनी सजवलेल्या जीपमध्ये उभे राहून बापट आणि कुल पुणेकरांना अभिवादन करत होते. सलग पाच वेळा कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले बापट यांनी सकाळी कसबा गणपतीची पूजा केल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ केला. कांचन कुल थोड्या उशिरा मिरवणुकीत सहभागी झाल्या. मिरवणुकीतील गर्दी पाहून कुल यांनी ‘आम्हाला कशाची भीती? मागे उभी महायुती’ अशी घोषणा दिली. नरपतगीर चौकात पोहोचलेल्या मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले. या वेळी सर्वच
वक्त्यांनी बापट आणि कुल हे दोन्ही उमेदवार ‘खासदार’ झाल्याचा
उल्लेख केला.

सगळ्यांचे लक्ष्य बारामती
सर्वच वक्त्यांचे लक्ष्य ‘बारामती’ होते. ‘एक लाखाने ही जागा सुप्रिया सुळे हरतील,’ अशी भविष्यवाणी खासदार संजय काकडे यांनी केली.
बारामतीकडे राज्याचेच नव्हे, तर दिल्लीचेही लक्ष लागले असून ही जागा जिंकायचीच, असे बापट म्हणाले.
‘पुण्याची चिंता करायचे कारण नाही. मी ४० वर्षे पुण्याचे प्रश्न हाताळतो आहे. नऊ निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे काळजीचे कारण
नाही. पुणे तर जिंकूच; शिवाय बारामतीही जिंकू,’ असे
बापट म्हणाले.
 

Web Title: Pune win; But take Baramati, the determination of Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.