पुण्यातील महिलेला मिळाले चेन्नईत हृदय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 01:33 AM2018-07-16T01:33:41+5:302018-07-16T07:16:37+5:30
हृदय आणि फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पुण्यातील राधिका या महिलेवर हृदय आणि फुप्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले
पुणे : हृदय आणि फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पुण्यातील राधिका या महिलेवर हृदय आणि फुप्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून मृत्युशी चाललेली तिची झुंज संपली आहे. महाराष्टÑात अनेक ठिकाणी उपचार केले, परंतु, काहीच उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी हात टेकले होते. त्यानंतर त्यांना चेन्नई येथील रुग्णालयाची माहिती मिळाली आणि त्यांनी तेथे जाऊन उपचार घेतले.
राधिकाला जीवदान देण्याचे हे काम चेन्नईतील एका हॉस्पिटलमध्ये घडले आहे. हृदय व फुप्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वीरित्या करवून घेणारी राधिका ही महाराष्ट्रातील तिसरी व्यक्ती ठरली आहे. राधिका ही मूळची इचलकरंजी येथील रहिवासी आहे. लग्नानंतर पती अभिजित सावंत सोबत पुण्यामध्ये आली. गेल्या ४ वर्षांपासून तिला हृदय व फुप्फुसाचा आजार झाला होता. तेव्हापासून ती रोज मृत्युशी झुंज देत होती. गेल्या ४ वर्षांमध्ये मोठमोठ्या हॉस्पिटल्सला त्यांनी भेट दिली. परंतु, सगळ्याच डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. मार्च महिन्यामध्ये त्यांना ग्लोबल हॉस्पिटल चेन्नईबद्दल माहिती मिळाली. त्यावेळेस त्यांनी कोणताही विचार न करता थेट चेन्नई गाठले. तेथे गेल्यानंतर कळाले हृदय व फुप्फुसाचे प्रत्यारोपण होऊ शकते. गेल्या ३ महिन्यांमध्ये तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. तसेच हृदय मिळण्यासाठी वाट पाहावी लागत होती. त्यानंतर नुकतेच हृदय मिळाले आणि राधिकावर प्रत्यारोपण करण्यात आले. त्यामुळे तिला नवजीवन मिळाले आहे. या उपचारासाठी मित्रांनी मदत केली.
>अवयवदानाची चळवळ वाढावी
दक्षिण भारतामध्ये अपघाती मृत्यू झालेले ७५ टक्के नागरिक अवयवदान करतात. त्यामुळे तेथे अनेकांना जीवदान मिळते. आपल्या महाराष्टÑातही अवयवदानाची चळवळ मोठ्या प्रमाणावर वाढली पाहिजे.
आम्ही गेल्या चार वर्षांमध्ये अनेक रुग्णालयांत गेलो. परंतु, डॉक्टरांनी आता काही उपयोग नाही, असे सांगितले. काही महिन्यांचीच ती सोबती असेल, असेही बोलले. परंतु, आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. मी इंटरनेटवर याबाबत सर्च केले. तेव्हा चेन्नईच्या रुग्णालयाची माहिती समजली. त्यानंतर तिथे आम्ही उपचार घेतले.
- अभिजित सावंत,
राधिकाचे पती