पुण्यातील मल्लांनी आॅलिम्पिक पदक जिंकावे, शरद पवारांनी चार कुस्तीपटूंना दिले तयारीसाठी आर्थिक साह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 05:59 AM2018-01-26T05:59:01+5:302018-01-26T05:59:15+5:30
आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले वैयक्तिक पदक महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवांनी जिंकून दिले होते. त्यानंतर आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही मल्लाने आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची कामगिरी केली नाही. पुण्यातील मल्लांनी २०२० मध्ये आॅलिम्पिक पदक जिंकून द्यावे, या दृष्टीने कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
पुणे : आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले वैयक्तिक पदक महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवांनी जिंकून दिले होते. त्यानंतर आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही मल्लाने आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची कामगिरी केली नाही. पुण्यातील मल्लांनी २०२० मध्ये आॅलिम्पिक पदक जिंकून द्यावे, या दृष्टीने कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, आगामी राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा राहुल आवारे व आंतरराष्ट्रीय मल्ल उत्कर्ष काळे यांना दत्तक घेवून आर्थिक साह्य दिले.
शरद पवार यांनी हे धनादेश मार्गदर्शक अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि भरत म्हस्के यांना वार्षिक प्रत्येकाला १२ लाख रुपयांचे धनादेश त्यांच्या तयारीसाठी दिले. या निधीचा योग्य-विनियोग करून वरील चार मल्लांना परदेशात आंतरराष्ट्रीय मल्लांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यासाठी पाठवावे, अशा सूचनाही दिल्या. याचबरोबर दोन्ही मार्गदर्शकांना या चारही मल्लांच्या कामगिरीवर योग्य प्रकारे लक्ष देऊन आगामी टोकियो आॅलिम्पिकमध्ये यांची भारतीय संघात निवड होण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी करून घ्यावी, असे सुद्धा सांगितले. खाशाबा जाधवांनंतर पुण्यातील या मल्लांनी आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकून आपल्या जिल्ह्य, राज्य आणि देशाचे नावलौकीक वाढवावा, या दृष्टीने शरद पवार यांनी या मल्लांना आगामी २ वर्षांसाठी आर्थिकसाह्य देण्याचे आश्वासन दिले. या मल्लांच्या खुराकामध्ये आणि सरावामध्ये कोणतीही कसर कमी पडता कामा नये, असाही सल्ला दिला.