तुम्ही शॉर्ट्स आणि स्लीपर घातल्यात : आमच्या हॉटेलमध्ये नो एंट्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:55 PM2018-07-11T13:55:53+5:302018-07-11T13:58:06+5:30
शॉर्ट पॅन्ट आणि पायात स्लीपर घातल्या आहेत असे सांगत रेस्टोरंटमध्ये प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यात घडली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील एजंट जॅक रेस्टोरंटमध्ये काही तरुणांना तुमचा अपिअरन्स हा आमच्या हॉटेलमधील सेवा देण्यास योग्य नाही सांगत प्रवेश नाकारला आहे.
पुणे : शॉर्ट पॅन्ट आणि पायात स्लीपर घातल्या आहेत असे सांगत रेस्टोरंटमध्ये प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यात घडली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील एजंट जॅक रेस्टोरंटमध्ये काही तरुणांना तुमचा अपिअरन्स हा आमच्या हॉटेलमधील सेवा देण्यास योग्य नाही सांगत प्रवेश नाकारला आहे. याबाबत चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की, शहरातील आयसीसी टॉवरच्या बी विंगमध्ये संबंधित रेस्टोरंट आहे. त्याठिकाणी काल रात्री असीम त्रिभुवन, विराज मुनोत, डॉ अजित वाडेकर, संजय होस्मानी, डॉ प्रदीप शालिनी, विलास कोंढाळकर यांनी रात्री ११.३० वाजता प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यातील काहींनी शॉर्ट पॅन्ट आणि स्लीपर घातली होती. या मुद्द्यावरून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. हॉटेलचे संचालक अझर यांच्याशी संवाद त्यांनी लॉबीतील नियम दाखवून त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला.त्यानंतर या तरुणांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. पोलीस आल्यावरही रेस्टोरंट प्रशासनाची भूमिका कायम होती.
तक्रारदार विलास कोंढाळकर यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, रात्री आम्हाला उशीर झाला होता. त्यामुळे आम्ही संबंधित रेस्टोरंटचा पर्याय निवडला. पण त्यांनी ज्या कारणावरून प्रवेश देण्यास मनाई केले ते योग्य नाही. कुठे काय घालून जायचे हा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे आम्ही तक्रार नोंदवली आहे. दुसरे तक्रारदार विराज मुनोत म्हणाले की, आम्ही सर्वजण सुशिक्षित आहोत, पूर्ण बिल देणार होतो. तिथल्या वातावरणाला बाधा येईल असे कोणतेही वर्तन आमच्याकडून झाले नाही. मग अशावेळी फक्त कपडे आणि चप्पल बघून प्रवेश नाकारणे चुकीचे आहे.