पुण्यात आता बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 05:23 PM2021-05-03T17:23:56+5:302021-05-03T17:31:45+5:30
अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांचा निर्णय
शहरातील अनधिकृत वृक्षतोड रोखण्यासाठी आता वृक्ष प्राधिकरणाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय नये वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांनी घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या सदस्य शिल्पा भोसले आणि इतर सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. महाराष्ट्र त्यांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 मधील कलम 19 क व ख अन्वये वृक्ष प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील. या ठरावानुसार प्रमाणपत्र घेतल्याशिवाय बांधकाम नकाशा मान्य करण्यात येणार नाही. तसेच कामापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसेल तर अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देखील दिले जाणार नाही. बांधकाम पूर्ण झाल्याचे, तसेच भोगवटा प्रमाणपत्र द्यायला सुद्धा याअंतर्गत बंदी करण्यात आलेली आहे. तसेच झाडे कापणे पुनर्रोपण करणे छाटणी करणे त्याला देखील परवानगी द्यायला बंदी घालण्याचा ठराव वृक्ष प्राधिकरण समितीकडून घेण्यात आला आहे.
बांधकाम करतेवेळी वृक्षतोड केली जाते आणि बांधकाम विभागाकडून परस्पर त्याबाबतची कार्यवाही केली जाते म्हणून बांधकाम नकाशा मंजुरी पूर्वीच ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले वृक्षतोड थांबवू शकेल अशी आमची भूमिका असल्याचे भोसले यांनी सांगितले. अर्थात यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे काम मात्र वाढणार आहे. दरम्यान हा ठराव मंजूर करून अंमलबजावणी साठी बांधकाम विभागाकडे पाठवला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.