Pune: इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 09:50 PM2024-10-04T21:50:04+5:302024-10-04T21:50:19+5:30
Pune Crime News: इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल अशोक चव्हाण याचा आज सकाळी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससून येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या गावी आणण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
इंदापूर - इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल अशोक चव्हाण याचा आज ( दि.४)सकाळी पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससून येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या गावी आणण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांकडे केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन मागील सोमवारी ( दि.३०) सायंकाळी रात्री पावणेसात ते सात वाजण्याच्या दरम्यान इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच राहुल चव्हाण याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. इंदापूर व अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी राहुलला पुण्यात हलवले होते.शरीरात घुसलेल्या तीन गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले होते. मात्र मणक्यामध्ये घुसलेल्या एका गोळीमुळे मूत्रपिंडामध्ये संसर्ग झाला.परिणामी राहुलची मृत्यूशी चाललेली झुंज संपली.
या प्रकरणी इंदापूर पोलीसांनी अभिजित बाळकृष्ण चोरमले, क्षितिज बाळकृष्ण चोरमले, प्रकाश हंबीरराव शिंदे, धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमले या चार आरोपींना अटक केली आहे. फरारी असणा-या अशोक केरबा चोरमले,विश्वजित हनुमंत चोरमले,महेश रमेश शिंदे,ओम सोमनाथ ठवरे,सोमनाथ ठवरे (सर्व रा. शिरसोडी,ता.इंदापूर) यां फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.
ससूनमधील शवविच्छेदन झाल्यानंतर राहुलचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या मूळगावी आणण्यात येणार आहे. राहुल व आरोपी एकाच गावचे असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी गावात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.