पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक सुरु होण्याआधीच वादात ;अर्ज भरण्याची वेळ उलटून गेली तरी हॉल बंदच !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 02:58 PM2020-01-11T14:58:13+5:302020-01-11T15:06:17+5:30
संबंधित सदस्य सभागृह उघडण्याची वाट बघत बसले आणि अर्ज भरण्याची वेळ उलटून गेली. त्यामुळे आता वादंग निर्माण झाला असून आमची फसवणूक केल्याचा आरोप करत सदस्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
पुणे : पुणेजिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याआधीच वादात अडकली आहे. ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या जाहीर करण्यात आलेल्या ठिकाणी सुरु न करता दुसऱ्याच ठिकाणी सुरु करण्यात आल्याने अनेक सदस्यांना अर्ज भरता आला नाही. संबंधित सदस्य सभागृह उघडण्याची वाट बघत बसले आणि अर्ज भरण्याची वेळ उलटून गेली. त्यामुळे आता वादंग निर्माण झाला असून आमची फसवणूक केल्याचा आरोप करत सदस्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा फटका विरोधी पक्षातील इच्छुक सदस्यांना बसला. जिल्हाधिकारी प्रशासनाने निवडणूक परिपत्रकानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया ही जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणार होती. अर्ज भरण्याची वेळ ही 11 ते 1 वाजेपर्यंत होती. यामुळे भाजपचे इच्छुक सदस्यांनी अर्ज भरण्यासाठी 11 वाजल्यापासून सभागृहाबाहेर बसले होते.
जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, जयश्री पोकळे, भाजपचे गटनेते शरद बुट्ट पाटील आणि आणखी काही सदस्यांचा यात समावेश होता. मात्र एक वाजून गेल्यावरही सभागृहाचे दारही उघडण्यात आले नव्हते. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीकडून उमेदवाराची घोषणा झाली. आणि प्रशासनाकडून पाचव्या मजल्यावर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. हे विरोधी सदस्यांना समजताच त्यांनी सभागृहाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली. त्यांनी या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात ई-मेल आणि फोनद्वारे तक्रार केली. विरोधी सदस्यांना निवडणुकीपासून दूर ठवण्याचा डाव असल्याच्या आरोप त्यांनी केला.ही निवडणूक प्रक्रिया थांबली पाहिजे अन्यथा या विरोधात न्यायालयात जाण्याच्या इशारा आशा बुचके यांनी दिला.