पुणे जिल्हा परिषदेचं स्तुत्य पाऊल ; महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरु केला चक्क पिरीयड फ्रेंडली कक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 06:31 PM2021-03-09T18:31:14+5:302021-03-09T18:45:33+5:30
महिला कर्मचाऱ्यांसाठी पिरियड फ्रेंडली रुम; सॅनिटरी नॅपकिनची सोय, तसेच शेकण्यासाठा पिशवी अशा अनेक सोयी
पुणे : मासिक पाळी दरम्यान जिथे अत्यावश्यक सोयींची वानवा तिथे आराम करण्यासाठी जागा मिळणे अवघडच. पण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तो पुणे जिल्हा परिषदेने. पुणे जिल्हा परिषदेने महिला कर्मचाऱ्यांसाठी चक्क पिरियड फ्रेंडली रुम सुरु केली आहे. या कक्षाचे उद्धाटन मंगळवारी (दि. ९) करण्यात आले.
मसिक पाळी दरम्यान महिलांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. कधी जास्त प्रमाणात होणारा रक्तस्त्राव तर कधी होणारी कंबर किंवा अंगदुखी. पण वर्किंग वुमन्सना पाळीच्या काळात आराम करायचा तर थेट सुट्टीच घ्यायची वेळ येते.
काही खासगी कंपन्यांनी आता 'पिरीयड लिव्ह'ला सुरुवात केली आहे. मात्र हा ट्रेंड सगळी कडे रुजायला वेळ लागणार आहे. त्यातच हा बदल सरकारी पातळींवर होणे आणखी अवघड आहे.
पण पुणे जिल्हा परिषद मात्र याला अपवाद ठरली आहे. महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक पाउल पुढे टाकत पिरियड फ्रेंडली कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षात आराम करण्याची सोय असणार आहेत. यासोबतच सॅनिटरी नॅपकिनची सोय, तसेच शेकण्यासाठा पिशवी अशा अनेक सोयी उपलब्ध असणार आहेत.