पुणे झेडपीचे आरक्षण जाहीर होणार १३ जुलैला; गट, गणांच्या सोडतीचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 03:52 PM2022-07-07T15:52:12+5:302022-07-07T15:52:57+5:30
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या गट आणि २८४ पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण सोडत कार्यक्रम तयार ...
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या गट आणि २८४ पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण सोडत कार्यक्रम तयार केला आहे. येत्या १३ जुलैला आरक्षण सोडत काढण्याचा आदेश निवडणूक आयोगाने संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे, त्यामुळे पुणेजिल्हा परिषदेतील ८२ गट व १६४ गणांच्या आरक्षणाच्या सोडतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषदांचे आरक्षण संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समित्यांचे संबंधित तालुक्याच्या ठिकाणी जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाबाबतचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने, सध्या तरी या प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या आदेशातून स्पष्ट झाले आहे.
- पुणे जिल्हा परिषदेची एकूण सदस्यसंख्या ८२ आहे. त्यापैकी ४१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यात सर्वसाधारण महिला ३४, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला ४ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गांसाठी ३ जागा आरक्षित असतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. सर्वसाधारण वर्गासाठी ६८ गट असून, त्यातील ३४ गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.
- पंचायत समितींचे १६४ गण असून, त्यातील ८२ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. एकूण संख्येपैकी १३९ गण हे सर्वसाधारण असल्याने ६८ गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जातींसाठी असलेल्या १५ पैकी ९ गण महिलांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जमातींसाठी १० गण आरक्षित असून, त्यातील ५ महिलांसाठी असतील.