बोचऱ्या थंडीमुळे पुणेकर गारठले..!
By admin | Published: December 30, 2014 12:26 AM2014-12-30T00:26:07+5:302014-12-30T00:26:07+5:30
शहर व उपनगरांमध्ये थंडीचा कडाका खूपच तीव्र झाल्याने आज तापमानात मोठी घट झाली. शहराचे किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
पुणे : शहर व उपनगरांमध्ये थंडीचा कडाका खूपच तीव्र झाल्याने आज तापमानात मोठी घट झाली. शहराचे किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यंदाच्या हंगामातील हे नीचांकी तापमान ठरले आहे. पारा घसरल्याने पुणेकर गारठल्याचे चित्र आज शहरात दिसत होते. बोचऱ्या थंडीमुळे रात्री शहरातील रहदारी कमी झाली होती.
दहा दिवसांपूर्वी शहराच्या तापमानात वेगाने घट होऊन तापमान ८ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र ढगाळ हवामानामुळे गेल्या आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली आणि थंडी शहरातून गायब होण्याच्या मार्गावर पोहोचली होती. मात्र गेल्या २ दिवसांपासून शहराच्या तापमानात पुन्हा घट नोंदविली गेली. ती आजही कायम होती. शहराच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा २.८ अंशांनी घट झाली होती. लोहगाव येथील तापमानात सरासरीपेक्षा २.२ अंशांनी घट होत ते ९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. किमानबरोबरच कमाल तापमानातही आज घट झाली आणि ते २७.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी घरातून बाहेर निघताना पुणेकरांनी स्वेटर्स, जर्किन, कानटोप्या, हातमोजे घातलेले होते. दुपारीही हवेत गारवा जाणवत होता. रात्री पुन्हा थंडीचा कडाका आणखी वाढला. यामुळे रात्री ९ नंतर शहरातील रहदारी कमी झाली होती. रस्त्यांवरून चालत जाणाऱ्यांची संख्या रोडावली होती.
पुढील २४ तास आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने शहराच्या तापमानात वाढ होईल आणि किमान तापमान १० अंशापर्यंत वाढेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)