punecoronavirus : पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा आठवर ; मुंबईतही दोन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 09:05 PM2020-03-11T21:05:33+5:302020-03-11T21:07:13+5:30
पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येत असून मंगळवारी पाच असणारी बाधितांची संख्या आता आठवर पोचल्याचे स्पष्ट झाले आहे
पुणे :पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येत असून मंगळवारी पाच असणारी बाधितांची संख्या आता आठवर पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुण्यात आठ आणि मुंबईत दोन अशा एकूण दहा व्यक्तींना महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आज मुंबईत कोरोनाने प्रवेश केला असला तरी पुण्यातही कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होताना दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साेमवारी रात्री पुण्यातील एका दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आलेहोते हे दाेघेही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुबई येथे फिरण्यास गेले हाेते. एक मार्च राेजी ते भारतात परतले. या दाेघांपैकी महिलेला त्रास झाल्याने त्यांनी काेराेनाबाबतची तपासणी करुन घेतली. यावेळी त्या महिलेला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले. त्या महिलेच्या पतीचीसुद्धा तपासणी करण्यात आली त्या रिपोर्ट्सनुसार त्यांनाही लागण झाल्याचे दिसून आले. पुण्यात संबंधित कोरोनाग्रस्त दाम्पत्याच्या मुलीला आणि त्यांना मुंबईहून पुण्यापर्यंत घेऊन आलेल्या ओला ड्रायव्हरलाही कोरोना झाल्याचे तपासणी अंती समोर आले. याशिवाय आणखीही एका सहप्रवासी व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
त्यापुढे बुधवारी पुण्यात विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या अजून तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातून बुधवारी एकूण दहा व्यक्तींच्या थुंकीचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही ) तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील सहा नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात तीन व्यक्तींना लागण झाल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. अजून चार नमुन्यांचा अहवाल येणे बाकी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.