पुणेरी ‘आकांक्षे’पुढती बुद्धिबळ‘विश्व’ ठेंगणे
By admin | Published: October 4, 2016 03:27 AM2016-10-04T03:27:57+5:302016-10-04T03:27:57+5:30
युवा प्रतिभावान बुद्धिबळ खेळाडू आकांक्षा हगवणे हिने कारकिर्दीतील मोठे शिखर सर करतानाच पुण्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे
पुणे : युवा प्रतिभावान बुद्धिबळ खेळाडू आकांक्षा हगवणे हिने कारकिर्दीतील मोठे शिखर सर करतानाच पुण्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे. रशियातील कान्ट-मॅन्सियस्क येथे सुरू असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने सोमवारी १६ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत आकांक्षाने ९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. अखेरच्या फेरीत पोलंडच्या स्लिव्हिस्का अॅलिसा हिच्यावर निर्णायक विजय मिळवून तिने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत तिला १२वे मानांकन होते.
नुकत्याच २ मोठ्या स्पर्धा जिंकल्या असल्याने आकांक्षाचा आत्मविश्वास उंचावलेला होता. शिवाय, या स्पर्धेसाठी तिचा सरावही चांगला झाला होता. यामुळे ती जिंकेल, असा विश्वास होता. मुलीचे कारकिर्दीतील हे पहिले विश्वविजेतेपद आमच्यासाठी अर्थातच स्पेशल आहे.
- वैशाली हगवणे, आकांक्षाची आई
१६ वर्षीय आकांक्षाचे २ महिन्यांतील हे तिसरे मोठे विजेतेपद आहे. याआधी तिने श्रीलंकेत झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षांखालील गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले. यानंतर कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात ती अजिंक्य ठरली होती.
या विजेतेपदाबरोबरच आकांक्षाने ‘इंटरनॅशनल वुमन मास्टर’चा किताब मिळविला. याआधीचा नॉर्म तिने २०१५मध्ये सोल (दक्षिण कोरिया) येथे झालेल्या स्पर्धेत मिळवला होता.
या स्पर्धेत १४, १६ व १८ वर्षांखालील मुलांच्या तसेच मुलींच्या गटांतून खेळत असलेल्या एकूण १८ भारतीय खेळाडूंपैकी केवळ आकांक्षालाच सुवर्णपदक जिंकण्यात यश लाभले आहे.