‘जीवनदायी’कडे पुणेकरांची पाठ!
By admin | Published: April 28, 2015 11:19 PM2015-04-28T23:19:29+5:302015-04-28T23:19:29+5:30
मोठमोठी रुग्णालये, आधुनिक मशीन्स, अत्याधुनिक उपचाराने परिपूर्ण असलेल्या पुण्याने मात्र ‘जीवनदायी’कडे पाठ फिरवली आहे.
राहुल कलाल ल्ल पुणे
मोठमोठी रुग्णालये, आधुनिक मशीन्स, अत्याधुनिक उपचाराने परिपूर्ण असलेल्या पुण्याने मात्र ‘जीवनदायी’कडे पाठ फिरवली आहे. राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत पुणे पिछाडीवर असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुण्यापेक्षा छोट्या जिल्ह्यांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबविली जात असून, योजनेच्या अंमलबजावणीत पुणे ११ व्या क्रमांकावर आहे.
एकीकडे आजार वाढत असताना त्यावरील उपचारांसाठीचा खर्चही भरमसाठ प्रमाणात वाढत आहे. गरिबांना, मध्यमवर्गीयांना असाध्य आजार जडल्यास उपचारावरील खर्च करण्यास परवडत नसल्याने या आजारांनी मृत्यू होण्याचे प्रमाण
जास्त होते.
हे ओळखून राज्य शासनाने डिसेंबर २०११ मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आणि त्यामाध्यमातून विविध ३० आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. अवघ्या तीन वर्षात या योजनेंतर्गत लाखो रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. मात्र, त्यात पुण्यातील रुग्णांची संख्या नगण्यच आहे.
कर्करोग, हृदयरोग आदी आजारांवर अत्याधुनिक आणि यशस्वी उपचार करण्यासाठी पुण्यात दिवसेंदिवस अनेक मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालये उभी राहत आहेत. शासकीय रुग्णालयेही कात टाकत आहेत. पण या रुग्णालयांमध्ये जीवनदायी योजनेंतर्गत मोफत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१४ या तीन वर्षांत राज्यातील तब्बल ४ लाख ८१ हजार २६ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी केवळ १४ हजार २२४ पुणेकर रुग्ण आहेत.
राज्य शासनाचे जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपचारांची कमतरता होती. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात उपचार केले जात नव्हते. आता या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक मशिन्स आणि अनुभवी, तज्ज्ञ डॉक्टर घेण्यात येत आहेत. त्यामुळे आता रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अटी आणि शर्तींमुळे अनेक खासगी रुग्णालये ही योजना राबवत नाहीत. त्यामुळे पुण्यात जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. पण आता ही संख्या वाढेल.
- डॉ. हनुमंत चव्हाण, उपसंचालक, पुणे विभाग, राज्य आरोग्य खाते
जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेणारे पुण्यातील सर्वाधिक रुग्ण हे कर्करोगाचे आणि हृदयरोगाचे आहेत. यावरून पुण्याला कर्करोग आणि हृदयरोगाचा विळखा पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या ३ वर्षांत तब्बल ३ हजार ७०८ कर्करोगींवर विविध प्रकारचे उपचार करण्यात आले आहेत. तर, २ हजार ७०१ हृदयरोगींवर उपचार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, असाध्य आजारांबरोबर शारीरिक व्यंग घालविण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करण्याकडेही पुणेकरांचा ओढा वाढू लागला आहे. तीन वर्षांत ३८ जणांवर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली आहे.
मुंबई व उपनगर१,१२,७०६
सोलापूर३४,२२२
नांदेड२९.४५१
ठाणे२४,४९२
अमरावती२४,३९५
रायगड२०,४२९
नाशिक१८,६२७
कोल्हापूर१७,८४७
अहमदनगर१७,२७२
जळगाव१७,०८९
पुणे१४,२२४