पुणेकरांनो, सावधानता बाळगा, स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:52 AM2018-09-09T00:52:37+5:302018-09-09T00:52:46+5:30
शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहे.
पुणे : शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संसर्गजन्य आजार होऊ नयेत, म्हणून नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
शहरात सध्या स्वाइन फ्लू व डेंग्यूचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्याने योग्य काळजी न घेतल्यास त्याचा प्रसार लगेच होतो. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत ११९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.८) २ हजार ५९० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०१ रुग्णांना टॅमी फ्लू गोळ्या देण्यात आल्या. तर ३७ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून १२ रुग्णांना लागण झाल्याचे तपासणीत आढळून आल्याचे आरोग्य अधिकारी
डॉ. अंजली साबणे सांगितले.
े पिंपरींमध्येही स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि.७) १२ आणि शनिवारी (दि.८) ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. दोन दिवसांत तब्बल १५ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे.
>अशी घ्या काळजी
स्वाइन फ्लूची लक्षणे असल्यास
गर्दीत जाणे टाळा.
ताप, सर्दी, खोकला झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मधमेह, हृदयरोग यांसारखे आजार असलेल्या व्यक्ती तसेच पाच वर्षांखालील मुले, गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी.
हात वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने धुवावेत.
पौष्टिक आहार घ्या.
लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करा.
भरपूर पाणी प्या.
शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर
रुमाल ठेवा.
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
>स्वाइन फ्लूची लक्षणे
ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी