हेल्मेट न घालणे पुणेकरांना पडले महागात

By admin | Published: January 3, 2016 04:46 AM2016-01-03T04:46:26+5:302016-01-03T04:46:26+5:30

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचे सूतोवाच केले असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही त्यांनी नुकतेच दिले आहेत. यामुळे हेल्मेटसक्तीचा

Puneites fell without costing helmet, expensive | हेल्मेट न घालणे पुणेकरांना पडले महागात

हेल्मेट न घालणे पुणेकरांना पडले महागात

Next

पुणे : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचे सूतोवाच केले असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेशही त्यांनी नुकतेच दिले आहेत. यामुळे हेल्मेटसक्तीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे शहर वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात हेल्मेट न घालणाऱ्या तब्बल ३ लाख ८ हजार ५६५ वाहनचालकांवर कारवाई करीत ३ कोटी १३ लाख ४६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत हेल्मेट कारवाईत वसूल करण्यात आलेला आजवरचा हा सर्वात मोठा दंड आहे.
पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या संख्येत भरमसाट वाढ होत चालली आहे. यासोबतच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. वर्षाला साधारणपणे ४०० नागरिकांचा पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रस्त्यांवर अपघाती मृत्यू होतो. वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम पुणेकरांनी यंदाही कायम ठेवला आहे. गेल्या वर्षभरात हेल्मेट आणि ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या विशेष मोहिमा घेऊन वाहतूक पोलिसांनी जोरदार दंडवसुली केली आहे.
हेल्मेट आणि वाद हे पुण्यातले एकप्रकारचे समीकरण झालेले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्यापासून सुरू झालेले हेल्मेटसक्ती राबविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. परंतु वेळोवेळी झालेली सक्ती पुणेकरांनी आणि सामाजिक संस्थांनी आंदोलनांद्वारे हाणून पाडली. हेल्मेटसक्तीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी एक मध्यम मार्ग काढला. कोणताही वाहतूक नियमभंग केल्यास त्याच्यासोबत हेल्मेट कारवाई केली जाऊ लागली. ती अद्याप सुरू आहे. दिवाकर रावते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांना बळ मिळाले असून यापुढे हेल्मेट कारवाया आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात वाहतूक पोलीस आणि नागरिकांमध्ये हेल्मेटवरून वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

जनजागृतीसाठी ‘हेल्मेट पुणे’ची स्थापना
आजच्या धकाधकीच्या आणि गर्दीच्या जमान्यात सुरक्षित जीवनासाठी हेल्मेट वापरणे अतिशय गरजेचे आणि उपयुक्त आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने सक्ती करून हेल्मेट वापरण्यापेक्षा स्वेच्छेने हेल्मेटचा वापर केला पाहिजे. वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेतली, तर हेल्मेट नसल्याने अनेकांचे जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे येत्या काळात प्रत्येकाने हेल्मेट वापरावे व आपले जीवन सुरक्षितपणे जगावे, यासाठी ‘हेल्मेट पुणे’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून हेल्मेट वापराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. प्रदीप निफाडकर आणि अनिल मंद्रुपकर यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
पुण्यातही हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काहींनी त्याला विरोध केल्याने ते होऊ शकले नाही. हेल्मेट घातलेली व्यक्ती कितीही मोठ्या अपघातातून बचावल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे सर्वांनी स्वेच्छेने हेल्मेट परिधान करायला हवे. ‘हेल्मेट पुणे सुरक्षित पुणे’ हा नारा घेऊन नवीन वर्षात हेल्मेट पुणे ही संस्था हेल्मेटबाबत जनजागृती करणार आहे. या उपक्रमात संस्था, व्यक्ती, पोलीस सर्वांनीच सहभागी व्हावे, असे आवाहन निफाडकर व मंद्रुपकर यांनी केले आहे. पथनाट्य, प्रदर्शने, पत्रके, आदी माध्यमातून केली जाणार आहे.

वर्षाला चारशेच्या आसपास होणाऱ्या प्राणांतिक अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्येही हेल्मेट न घालणाऱ्या अनेकांना प्राण गमवावे लागतात. विशेष म्हणजे या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हेल्मेट घालण्याचा आमचा आग्रह कायदा म्हणून तर आहेच; परंतु काळजी म्हणूनही आहे. हेल्मेट कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.
- सारंग आवाड, उपायुक्त,
पुणे शहर वाहतूक शाखा

हेल्मेट न वापरल्याने अपघात होऊन कायमचे अपंगत्व येते अथवा रुग्ण दीर्घ काळासाठी बेशुद्धावस्थेत जाण्याचे प्रकार घडतात. हॉस्पिटलमध्ये दर दिवशी ३ ते ५ रुग्ण लहान-मोठी दुखापत झाल्याने दाखल होतात. काही दुखापती गंभीर असतात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर अपरिहार्य आहे. हेल्मेट घातल्याने केस गळतात, मणक्याचे दुखणे उद्भवते, डोके दुखते असे चुकीचे समज लोकांमध्ये रुढ आहेत. हेल्मेट घातल्याने यापैकी कोणताही त्रास उद्भवत नाही. - डॉ. मंगेश उदार

मित्राचा फोन आला म्हणून माझा मुलगा घाईघाईत घरातून बाहेर पडला. हेल्मेट न घालताच गाडीला किक मारून निघून गेला. काही वेळातच त्याचा अपघात झाल्याची बातमी समजली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अद्याप शुद्धीवर आलेला नाही. डॉक्टरही ‘सगळे ठीक होईल,’ असा दिलासा देत आहेत. तो हेल्मेट घालून गेला असता तर संसार उद्ध्वस्त होण्याची ही वेळ आली नसती. स्वत:चा आणि कुटुंबाचा विचार करून तरी सर्वांनी हेल्मेट वापरायला हवे, असे वाटते. - रुग्णाची आई

Web Title: Puneites fell without costing helmet, expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.