पाकिस्तानमधील 'किल्ले अटकची' प्रतिकृती पाहण्याची पुणेकरांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 07:25 PM2018-11-05T19:25:19+5:302018-11-05T19:27:41+5:30
मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे प्रतिक असणाऱ्या पाकिस्तानमधील अटक किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती राज्यात प्रथमच धनकवडी येथे सुवर्णयुग तरुण मंडळाने साकारली अाहे.
पांडुरंग मरगजे
धनकवडी : मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे प्रतिक असणाऱ्या पाकिस्तानमधील अटक किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती राज्यात प्रथमच धनकवडी येथे सुवर्णयुग तरुण मंडळाने साकारली अाहे. या प्रतिकृतीच्या अनावरण प्रसंगी छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते.
मराठा स्वराज्य चौफेर वाढवून त्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे छत्रपती थोरले शाहू महाराज यांची मुत्सद्देगिरी आणि मराठयांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे पाकिस्तानमधील 'किल्ले अटक'. भारताबाहेरील मराठा पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती राज्यात प्रथमच धनकवडी येथे सुवर्णयुग तरुण मंडळाने साकारली आहे. धनकवडीतील शेवटच्या बस थांब्याजवळ गणेश प्रेस्टीज इमारतीसमोर उभारयात आलेली ही प्रतिकृती नागरिकांसाठी पर्वणी ठरत आहे. यावेळी बाेलताना संभाजीराजे म्हणाले, रायगड व परिसरातील विकास आणि संवर्धनाची कामे पुर्ण होत आहेत. ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी १२० कोटी गडावर तर उर्वरित निधी परिसरात खर्च करण्यात येणार आहे. काही दिवसातच रायगडाचे बदलते रुप आपल्याला पाहायला मिळेल. याच धर्तीवर आणखी नवीन किल्ल्यांचा विकास आणि संवर्धन करण्यात येणार अाहे.
मराठ्यांनी १७५८ ला अब्दालीच्या विरोधात मोहीम चालवल्यावर सध्याचा पाकिस्तानसह अनेक भूभाग जिंकला त्यात प्रामुख्याने संपूर्ण बलुचिस्तान, मध्य पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सिमेपर्यंत आपले साम्राज्य विस्तारले होते. याच मोहिमेत किल्ले लाहोर, पेशावर, रानिकोट, अटक आणि जमरूड हे किल्ले जिंकले होते. त्या काळात इराणी ,अफगाणी बादशाह जेव्हा दिल्ली वर स्वारी करायचे तेव्हा अलीकडं किल्ले अटक जिंकणे हे भौगोलिक दृष्ट्या फार महत्व असायचे, दक्खनेतून नर्मदा ओलांडत दिल्ली जिंकत आणि पुढे किल्ले अटक जिंकत मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले , नवीन अभ्यासातून मराठ्यांनी खैबर खिंडीतून काबुल वर छापे मारल्याचे ही पुरावे पुढे येत आहेत ,गेल्या ५००-६०० वर्षात दक्खनेतून उत्तेरात एवढा मोठा भूभाग जिंकत साम्राज्य विस्तारणारी एकमेव मराठा राजवट ठरली, या मोहिमेत मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, मानाजी पायगुडे, नेकाजी भोसले, सरदार पानसे यांनी नेतृत्व करत मोलाची कामगिरी बजावली.
सुवर्णयुग तरुण मंडळ गेली २ वर्षांपासून पाकिस्तान मधे जिंकलेल्या किल्ल्यांची प्रतिकृती सादर करत आहेत,किल्ल्याची भौगोलिक माहिती ,इतिहास आणि दुर्मिळ फोटो हे माहिती फ्लेक्स द्वारे देण्यात अाली आहे. विशेष म्हणजे या प्रतिकृती चे कायमस्वरूपी जतन करून इतरांना ही पहाण्यासाठी उपलब्ध असणार आहे. हि प्रतिकृती पुर्णपणे फोम शीट मधे बनवली आहे. किल्ल्याचे पूजन श्रीमंत सत्यशील राजे दाभाडे आणि आमदार भीमराव तापकीर यांनी केले.
प्रमोद मांडे स्मृती मंडळाच्या सदस्य प्रणय घुले, अक्षय घुले यांनी प्रतिकृती साकारली . यावेळी तात्यासाहेब भिंताडे , नगरसेविका वर्षा तापकीर ,सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, इतिहास अभ्यासक अरुण पायगुडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक गणेश भिंताडे यांनी केले . तर गणेश दिघे, नितीन पायगुडे ,विक्रांत निकम यांनी नियोजन पार पाडले.