हॉस्पिटल माफियांकडून पुणेकरांची होतेय लूट

By admin | Published: December 1, 2015 03:46 AM2015-12-01T03:46:48+5:302015-12-01T03:46:48+5:30

महापालिकेने शहरातील अनेक हॉस्पिटलना जागा, जादा एफएसआय दिला; त्यानुसार त्या हॉस्पिटलनी पुणेकर नागरिकांवर मोफत तसेच सवलतीच्या दरात उपचार करणे आवश्यक

Puneites looted by hospital mafia | हॉस्पिटल माफियांकडून पुणेकरांची होतेय लूट

हॉस्पिटल माफियांकडून पुणेकरांची होतेय लूट

Next

पुणे : महापालिकेने शहरातील अनेक हॉस्पिटलना जागा, जादा एफएसआय दिला; त्यानुसार त्या हॉस्पिटलनी पुणेकर नागरिकांवर मोफत तसेच सवलतीच्या दरात उपचार करणे आवश्यक असताना त्यांच्याकडून या सुविधा दिल्या जात नाही. हॉस्पिटल ही सेवा देणारी केंद्रे न राहता, चोर बनली आहेत. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडत असून असेच सुरू राहिले, तर लोक तुम्हाला रस्त्यावर खेचल्याशिवाय राहणार नाहीत, अशी जोरदार टीका नगरसेवकांनी सोमवारी मुख्य सभेत केली.
महापालिकेच्या मुख्य सभेत अविनाश बागवे यांनी रुबी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल (कर्वे रस्ता, बोपोडी), एम्स हॉस्पिटल औंध यांच्याकडून रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले जात नसल्याचा विषय उपस्थित केला. याचा तीव्र शब्दांत निषेध करून सभागृह नेते बंडू केमसे, रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे, सुभाष जगताप, बापू कर्णे, नगसेविका संगीता तिकोणे, नगरसेवक धनंजय जाधव, सतीश म्हस्के, सचिन भगत, योगेश मुळीक, राजा लायगुडे, प्रशांत जगताप, चेतन तुपे, बंडू गायकवाड, अभय छाजेड, सिद्धार्थ धेंडे, प्रिया गदादे यांनी जोरदार टीका केली.
बंडू केमसे म्हणाले, ‘‘हॉस्पिटल चोर असून पुणेकर नागरिकांना लुटत आहेत. औषधे नाहीत म्हणून पुणेकर नागरिक जीव सोडतात. राजीव गांधी हॉस्पिटलमधील दोन मजले बंद असून, तिथे फक्त दहा बेड सुरू आहे. हॉस्पिटलसोबत अधिकाऱ्यांचे संगनमत असल्यानेच हे घडत आहे. एक दिवस पुणेकर नागरिक तुम्हाला रस्त्यावर खेचतील.’’
प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘हॉस्पिटलकडे गरीब रुग्णांना सवलत देण्याची क्षमायाचना आम्ही अनेकदा करतो; मात्र ते प्रतिसाद देत नाहीत. हॉस्पिटल माफियांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे.’’ सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले, ‘‘महापालिका आरोग्यासाठी मोठा खर्च करते. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त खर्च हा नगरसेवक, अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता होतो. गरजूपर्यंत या सुविधा खूपच कमी पोचतात.’’ हॉस्पिटलच्या या योजनांची आरोग्य विभागाने व्यापक प्रसिद्धी केलेली नसल्यामुळे त्याची माहिती नागरिकांना मिळत नाही. ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सुभाष जगताप यांनी केली. पूना हॉस्पिटलने महापालिकेकडून घेतलेल्या जागेचा वापर पार्किंगसाठी केला आहे, करारानुसार तसे करता येत नसल्याचे धनंजय जाधव यांनी सांगितले.

शहराची हेल्थ पॉलिसी ठरविणार
- जादा एफएसआय घेतलेल्या हॉस्पिटलनी करारानुसार नागरिकांवर उपचार करावेत, याकरिता सर्व हॉस्पिटल चालकांची आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेतली जाईल. प्रत्येक प्रभागामध्ये महापालिकेची ओपीडी व विभागवार हॉस्पिटल सुरू केले जाईल. त्याचबरोबर शहराची हेल्थ पॉलिसी तयार केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले. शहरी गरीब रुग्णांसाठी वेगळे दर लावले जात असतील, तर त्यांची चौकशी केली जाईल. तसेच, रेसिडेन्ट मेडिकल डॉक्टरांनी हॉस्पिटलजवळच राहिले पाहिजे याच्या सूचना दिल्या जातील, असे जगताप यांनी स्पष्ट केले.

हॉस्पिटलवर आरोप
- या हॉस्पिटलनी पुणेकर नागरिकांवर मोफत तसेच सवलतीच्या दरात उपचार करणे आवश्यक असताना त्यांच्याकडून या सुविधा दिल्या जात नाही. हॉस्पिटल ही सेवा देणारी केंद्रे न राहता, चोर बनली आहेत. हॉस्पिटलसोबत अधिकाऱ्यांचे संगनमत असल्यानेच हे घडत आहे.

Web Title: Puneites looted by hospital mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.