रक्ताने माखलेल्या 'त्या' गाठोड्याने उडविली पुणेकर आणि प्रशासनाची धांदल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 11:21 PM2020-12-09T23:21:41+5:302020-12-09T23:22:13+5:30
वारजे माळवाडी पोलिसांना डुक्करखिंड येथे रस्त्यावर रक्ताने माखलेले गाठोडे पडले असल्याचा फोन आला...
पुणे : वेळ दुपारी दोनची...डुक्कर खिंडच्या सेवा रस्त्यालगत रक्ताने माखलेले एक गाठोडे आढळून आले. एका पादचाऱ्याने ही माहिती वारजे माळवाडी पोलिसांना दिली.आणि सुरु झाली पुणेकर आणि पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. त्या घडीला कुणाला काहीच अंदाज बांधणे शक्य नव्हते. त्यामुळे तात्काळ घटनास्थळी पोहचण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
कोथरुड परिसरात सकाळपासून शिरलेल्या रानगव्यामुळे संपूर्ण परिसरात एकच चर्चा झाली होती. त्यात रस्त्यालगत हे रक्ताने माखलेले गाठोडे म्हटल्यावर पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेतली. पोलीस तेथे पोहचले व त्यांनी पाहिले तर त्या गाठोड्यातून अजूनही रक्त वाहत होते. काही तरी भयंकर प्रकार असल्याचे वाटल्याने महापालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारीही घटनास्थळी आले. सर्वांसमक्ष ते गाठोडे उघडण्यास सुरुवात केली. त्याबरोबर आतून कोंबड्याचे काही अवयव आढळून आले. इतक्या वेळ श्वास रोखून पाहणार्यांनी मेलेल्या कोंबड्या पाहून निश्वास सोडला.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी सांगितले की, डुक्कर खिंडीतील रस्त्यालगत एका रक्ताने भरलेले गाठोडे असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक अमृत मराठे, उपनिरीक्षक अशोक येवले, रामदास शेवते व कर्मचारी घटनास्थळी गेले. पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बाबासाहेब मोरे हेही घटनास्थळी आले. हे गाठोडे उघडून पाहिल्यावर त्यात मेलेल्या कोंबड्या व त्यांचे अवयव आढळून आले. कोणीतरी जाताना हे गाठोडे फेकले असल्याचा संशय आहे.