टाॅमी, टायगरने पुणेकरांना अाणले जेरीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 08:54 PM2018-08-29T20:54:09+5:302018-08-29T20:55:41+5:30
पुण्यातील वाढत्या भटक्या कुत्र्यांनी पुणेकरांना जेरीस अाणले असून या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण अाणण्याची मागणी नागरिक करीत अाहेत.
पुणे : पुणे शहर हे देशात राहण्यासाठी सर्वाेत्तम शहर असल्याचे नुकताच जाहीर करण्यात अाले अाहे. परंतु याच पुण्यात भटक्या कुत्र्यांनी मात्र पुणेकरांना जेरीस अाणले अाहे. जवळपास दीड लाखाहून अधिक भटकी कुत्री शहरात असून त्यांच्या उच्छादाने पुणेकर पुरते वैतागले अाहेत. त्यामुळे या रस्त्यावरच्या टाॅमी, टायगरपासून कधी सुटका मिळणार असा प्रश्न नागरिकांना पडला अाहे.
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या कमालिची वाढली अाहे. रात्री उशीरा घरी जाणाऱ्या दुचाकी चालकांच्या मागे ही कुत्री लागत असल्याने अनेक अपघातही झाले अाहेत. त्यातच महापालिकेच्या अाराेग्य विभागाच्या अाकडेवारीनुसार जानेवारी ते जुलै 2018 या कालावधीत एकूण 6 हजार नऊशे 39 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून 11 नागरिकांना रेबीजची लागण झाल्याचे समाेर अाले अाहे. भटकी कुत्री शहरातील सर्वच भागामध्ये गटागटाने नागरिकांवर हल्ले करत असल्याने महिलांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण अाहे. ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या जवळ ही कुत्री भटकत असतात. एखाद्याच्या हातात एखादी पिशवी असेल, किंवा काही सामान असेल तर कुत्री त्यांच्यावर हल्ला करतात. त्याचबराेबर सकाळी माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत अाहे. जाॅगिंक करताना अनेकांच्या मागे ही कुत्री लागत असल्याने नागरिकांना व्यायाम करणेही कठीण झाले अाहे. तसेच ही कुत्री रस्त्यावर कुठेही घाण करीत असल्यामुळे रस्त्यावरुन चालणेही कठीण झाले अाहे.
त्यातच काही नागरिकांची पाळीव कुत्री ही रस्त्यावरच घाण करत असल्याने रस्ते अधिकच अस्वच्छ हाेत अाहेत. शहरातील बहुतांश भागातील चित्र सारखेच अाहे. या कुत्र्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक विविध उपाय करीत अाहेत. काहींनी अापल्या घराच्या दारात एका बाटलीमध्ये लाल रंगाचे पाणी सुद्धा ठेवून पाहिले. काही महिन्यांपूर्वी बाणेरमध्ये काही कुत्री ही मृतावस्थेत अाढळली हाेती, अशीच घटना हडपसर मध्ये सुद्धा घडली हाेती. या घटनांचा तपास पाेलीस यंत्रणा करत अाहेत. प्रशासन या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण अाणण्यात कमी पडत असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत अाहे.
कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात बाेलताना महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रकाश वाघ म्हणाले, सध्या शहरातील दाेन ठिकाणी या भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रीया करण्यात येत अाहे. दिवसाला साधारण 50 ते 60 भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. काही स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने नसबंदी केंद्रे वाढविण्याचा अामचा प्रयत्न अाहे. तसेच सेंट्रलिंग डाॅग कॅचिंक अॅण्ड रिलिज सिस्टीम उपक्रम अाम्ही हाती घेत अाहाेत. ज्या अंतर्गत कुत्र्यांना लसीकरण करणाऱ्या संस्थेने एक अॅप डेव्हलप करावे लागणार अाहे. ज्यात नसबंदी केलेल्या कुत्र्यांची तसेच न केलेल्या कुत्र्यांची माहिती मिळू शकणार अाहे. तसेच लसीकरण केलेल्या कुत्र्यांच्या गळ्यात एक काॅलर लावण्यात येणार असून त्यात चीप बसविण्यात येणार अाहे. ज्या माध्यमातून त्या कुत्र्यांच्या लसीकरणाबद्दलची माहिती मिळण्यास मदत हाेणार अाहे. सध्या मनुष्यबळाचा अभाव असला तरी येत्या काळात जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा अामचा प्रयत्न असणार अाहे. येत्या काळात अधिक काही लसीकरण केंद्रे सुरु करण्याचा अामचा प्रयत्न अाहे.