पुणेकरांनी साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त ; तब्बल 7 हजार वाहनांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 03:19 PM2019-04-07T15:19:20+5:302019-04-07T15:25:41+5:30
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सहा दिवसांत पुणेकरांनी तब्बल ७ हजार एकशे ९८ वाहनांची खरेदी केली आहे.
पुणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सहा दिवसांत पुणेकरांनी तब्बल ७ हजार एकशे ९८ वाहनांची खरेदी केली आहे. त्यामुळे सर्वाधिक ४ हजार ४३५ दुचाकींचा समावेश आहे. मागील वर्षी ७ हजार २७९ वाहनांची खरेदी झाली होती.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीबरोबरच वाहनांची खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते. या दिवशी वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची धडपड असते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या काही दिवस आधीपासूनच वाहन वितरकांकडे नागरिकांची गर्दी होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झाल्याशिवाय ग्राहकांना वाहन दिले जात नाही. नोंदणी झाल्यानंतरच ग्राहकांना मुहुर्ताच्या दिवशी वाहन देण्यात येते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाहनांना मोठी मागणी राहिली. दि. १ ते ६ एप्रिल या कालावधतीत एकुण ७ हजार १९८ वाहनांची खरेदी झाली. त्यामध्ये ४ हजार ४३५ दुचाकी, १ हजार ९०६ चारचाकी, ३३२ तीन चाकी, ४४१ माल वाहतुक करणारी वाहने, ७४ प्रवासी वाहने आणि १० इतर वाहनांचा समावेश आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी ९४३ वाहनांची खरेदी झाली. मागील सहा दिवसांच्या विक्रीतून आरटीओला ३३ कोटी ११ लाख ३८ हजार ९०४ रुपयांचा महसुल मिळाला. गतवर्षी दि. १३ ते १८ मार्च या गुढीपाडव्याच्या कालावधीत ३१ कोटी ४० लाख ४२ हजार ८२३ रुपयांचा महसूल जमा झाला होता. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकांना नोंदणी अभावी वाहन घरी घेऊन जाता आले नाही. त्यामुळे वितरकाकडे जाऊन तिथे केवळ पुजा केली जात होती. त्यामुळे अनेक जण वाहन घरी नेण्याचा मुहूर्त हुकल्याने नाराज झाले.
दि. १ ते ६ एप्रिलदरम्यान वाहन विक्री
दुचाकी ४४३५
चारचाकी १९०६
तीनचाकी ३३२
माल वाहतुक ४४१
प्रवासी वाहने ७४
इतर १०
एकुण ७१९८