पुणेकर गारठले! शहरात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, हवेतील गारवा वाढला

By श्रीकिशन काळे | Published: December 16, 2023 12:25 PM2023-12-16T12:25:42+5:302023-12-16T12:26:14+5:30

तसेच इतर ठिकाणी देखील किमान तापमानात घट दिसून येत आहे...

Punekar Garathle! The city recorded a temperature of 10 degrees Celsius, the air was sweltering | पुणेकर गारठले! शहरात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, हवेतील गारवा वाढला

पुणेकर गारठले! शहरात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, हवेतील गारवा वाढला

पुणे : दोन दिवसांपासून शहरात थंडी वाढू लागली आहे. शनिवारी (दि.१६) तर दिवसभर हवेतील गारवा खूपच वाढला आहे. सकाळी पाषाण परिसरात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच इतर ठिकाणी देखील किमान तापमानात घट दिसून येत आहे. 

राज्यात आणि पुणे शहरात गारठा वाढला आहे. येत्या आठवड्यात राज्यात हवामान कोरडे राहणार असून, १७ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सध्या राज्याच्या किमान तापमानात मोठी घट होत आहे. विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १२ अंशांच्या खाली आला आहे. रविवारी (दि.१७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी  पहाटेच्या वेळी गारठा वाढलेला जाणवत आहे.
दरम्यान रविवारी (दि.१७) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

निचांकी किमान तापमान-

पुणे शहरात शनिवारी या हंगामातील निचांकी किमान तापमान पाषाणला १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे पुणेकर गारठून गेले. कडाक्याच्या थंडीचा अनुभव पुणेकर घेत आहेत. येत्या दोन दिवसांत किमान तापमान आणखी कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

शहरातील किमान तापमान

पाषाण : १०.६
एनडीए : १०. ६
हवेली : १०.६ 
शिवाजीनगर: १२.०
लवासा : १२.८ 
कोरेगाव पार्क: १६.२
मगरपट्टा: १८.८ 

Web Title: Punekar Garathle! The city recorded a temperature of 10 degrees Celsius, the air was sweltering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.