थंडीने पुणेकर गारठले..! अचानक किमान तापमान ४ ते ६ अंशाने घटले
By श्रीकिशन काळे | Published: November 18, 2024 09:34 AM2024-11-18T09:34:03+5:302024-11-18T09:36:54+5:30
श्रीकिशन काळे पुणे : राज्यातील तापमानात चढ-उतार होत असून त्यामुळे पुणेकरांना सोमवारी थंडीचा कडाका जाणवला. रविवारी किमान तापमान १८ ...
श्रीकिशन काळे
पुणे : राज्यातील तापमानात चढ-उतार होत असून त्यामुळे पुणेकरांना सोमवारी थंडीचा कडाका जाणवला. रविवारी किमान तापमान १८ अंशावर होते, ते आज एकदम १४ अंशावर आले. एनडीए, हवेलीमध्ये तर पारा १२ अंशावर नोंदवला गेला. त्यामुळे पुणेकर थंडीने चांगलेच गारठले. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने वातावरण चांगलेच तापत असताना दुसरीकडे थंडीने पुणेकर कुडकुडत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचे सावटट होते. काही भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. पण, आता मात्र पावसासाठीची परिस्थिती निवळली आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा थंडी सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिम महाराष्ट्रातही तो जाणवत आहे. एकाच दिवसात किमान तापमानात ४ अंशाने घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
येत्या २४ तासांमध्ये पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात थंडी वाढणार असून, धुक्याचं प्रमाणही वाढू शकते. या आठवड्यात राज्यातील गारठा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवेली, एनडीएमधील किमान तापमान तर १२ अंशावर नोंदवले गेले. त्यामुळे या हंगामातील ही सर्वात कमी तापमानाची नोंद आहे.
आजचे पुण्यातील किमान तापमान
शिवाजीनगर : १४.५
हवेली : १२.५
एनडीए : १२.८
माळीण : १३.५
बारामती : १३.५
हडपसर : १६.६
कोरेगाव पार्क : १८.५
वडगाव शेरी : १९.७
मगरपट्टा : २०.६