Ashadhi Wari: माऊली अन् तुकोबांसोबत लाखो वैष्णवांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 05:17 PM2024-06-30T17:17:55+5:302024-06-30T17:18:10+5:30
पुण्यात विठूमय वातावरण झाले असून सर्वत्रटाळ - मृदांगाचा गजर ऐकू येतोय
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखींचें काल आळंदी आणि देहूतून प्रस्थान झाले. माऊली माऊली अन् तुकाराम महाराज कि जय आय जयघोषात त्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. आता लाखो वैष्णवांसहित दोन्ही पालखीचे थोड्याच वेळात पुण्यात आगमन होणार आहे. पालखींच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि नागरिक सज्ज आहेत.
आज सकाळपासूनच पुण्यात वारकरी, दिंडी येण्यास सुरुवात झाली आहे. शहरात सर्वत्र टाळ - मृदांगाचा गजर ऐकू येतोय. आता थोड्याच वेळात पालखींचें जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. पालख्यांसमोरील दिंड्या पुण्यनगरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या पालखी सोहळ्याच्या स्वागताला वरूणराजाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकर भक्तीरसात आणि जलरसात न्हाऊन निघत आहेत.
ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी पायीवारी (Ashadhi Wari) पालखी सोहळ्याने रविवारी (दि.३०) सकाळी सहाला लाखो वैष्णवांसह आजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला. प्रस्थानपूर्वी मध्यरात्री माउलींच्या आजोळी पादुकांना रुद्राभिषेक करून पंचामृत पूजा, पंच्चपक्व्वान्न नैवद्य, आरती, पसायदान घेण्यात आले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे लाखो भाविकांच्या साक्षीने शुक्रवारी दुपारी २.२५ वाजता खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, आमदार शेळके यांच्या पत्नी व जेष्ठ वारकरी व पंढरीनाथ महाराज तावरे यांच्या हस्ते झाली. आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका आणि महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह ‘‘ज्ञानोबा- तुकाराम’’ हा जयघोष करीत हा पालखी सोहळा लाखो भाविकांचा भक्तीचा महासागर पंढरीच्या वाटेला लागला.