फूड पाॅयझनिंगने पुणेकर बेजार, FDA कारवाई कधी करणार? हॉटेल चालकांकडून नियमांचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 10:49 AM2023-08-23T10:49:49+5:302023-08-23T10:52:07+5:30
बाहेरचं खाणं सगळ्यांनाच आवडतं. स्ट्रीट फूड तर सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. पुण्यातील हॉटेल्स शनिवार, रविवार हाऊस फुल्ल असतात. आणि बाहेर बऱ्याच वेळ वेटिंग असतं. पण त्या हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट फूड खाताना ते लोक स्वच्छता पळल्त का? अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे ते पालन करतात का? याचे उत्तर नाही असे आहे. कारण हे बाहेरचे अन्न खाऊन सध्या अनेकांना फूड इन्फेक्शन झाले आहे. याचाच ‘लाेकमत’ टीमने घेतलेला खास ग्राऊंड रिपाेर्ट...
पुणे : हॉटेल्समध्ये वेटरच्या डाेक्याला ना कॅप, ना हातात हॅण्डग्लोव्हज. विशेष म्हणजे वेटर ज्यांच्यावर जेवण वाढण्याची जबाबदारी असते तेच साफसफाई देखील करतात. ज्या हातांनी वाढले त्याच हातांनी टेबलही साफ करतात. पुन्हा ग्राहकांना त्याच हातांनी वाढतात. हे झाले बाहेरून चकचकीत दिसणाऱ्या हाॅटेलचे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरांत खाद्य मिळत असलेल्या स्ट्रीट फूडची अवस्था तर याहूनही अत्यंत वाईट. हा प्रकार म्हणजे पुणेकरांनी स्वत:चे पैसे खर्च करत बाहेरचे अन्न खाऊन आजारी पडण्यासारखे झाले. यावर लक्ष काेण ठेवणार? ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते अन्न व औषध प्रशासन (एफडीए) करतेय तरी काय? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. पुणेकर फूड पाॅयझनिंगने बेजार असताना ‘एफडीए’ मात्र केवळ कागदी घाेडे नाचवत आहे.
सध्या पुणेकर याआधीच व्हायरल, डाेळे येणे या आजारांनी बेजार झाले आहेत. त्यातच डेंग्यू, मलेरिया यांनीही डाेके वर काढले आहे. आता तर फूड पाॅयझनिंगमुळे आठवडाभर त्यांना घरी राहून काढावे लागत आहेत. ज्याला त्याला विचारले असता कुणी ना कुणी फूड पाॅयझनिंगचे शिकार झाल्याचे दिसून येते. या फूड पाॅयझनिंगचे रुग्ण मोठ्या प्रमाणात शहरातील हॉस्पिटल्समध्ये दिसून येत आहेत. आधी व्हायरलने छळले, मग डोळे आले; आता फूड पॉयझनिंगने वैतागल्याची भावना पुणेकर व्यक्त करत आहेत. हे सर्व सुरू असताना एफडीए केवळ नमुने काढू आणि कारवाई करू हे सांगून वेळ मारून नेत आहे. हा केवळ एक प्रशासकीय साेपस्कार पाडला जात आहे. मात्र, दुसरीकडे नागरिक त्यांच्या या निष्क्रियतेमुळे तसेच काेणत्याही प्रकारची कारवाई न केल्याचा परिणाम भाेगत आहेत.
फूड पाॅयझनिंगची कारणे वेगवेगळी आहेत. बहुतांश वेळा बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने हा त्रास हाेताे. शिळे अन्नपदार्थ, दूषित पाणी पिणे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे, खासकरून हातगाडीवर, तसेच काही हाॅटेलमधील अन्नपदार्थ ही फूड पाॅयझनिंगची कारणे आहेत. हे पदार्थ केवळ हाॅटेलमध्येच नाही, तर घरीदेखील खाल्ल्याने ही बाधा हाेत आहे; परंतु बाहेरच्या खाण्यामुळे याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे.
शहरातील हाॅटेल, हातगाडीवरील काही निरीक्षणे -
- पदार्थ विकणाऱ्या दुकानासमोरच कचरा आणि उष्टी ताटे
- खाऊगल्ल्यांमध्ये अनेक ठिकाणी एकाच नॅपकिनने हात पुसतात आणि त्याच नॅपकिनने प्लेटही पुसली जाते.
- हातात कोणत्याही प्रकारचे हॅण्डग्लोव्हज आणि कॅप नाही.
- उघड्यावरच अन्नपदार्थ ठेवले जातात.
- पदार्थ स्वस्त, पण स्वच्छता नाही.
- बऱ्याच ठिकाणी उघड्यावरच पदार्थ बनवले जातात.
- मोठमोठ्या हॉटेलमध्ये किचन कसे आहे हे बघता येत नाही.
- काही हॉटेल्समध्ये वेटर यांनी कॅप, हातमाेजे घातलेले आहेत.
- ठरावीक हाॅटेलमध्येच ढाबा स्टाईलनुसार ग्राहकांनाही किचन दिसते. अन्यथा बहुतांश ठिकाणी आत किचन दिसतच नाही.
- डेक्कन काॅर्नर येथील खाऊगल्लीत तर मेट्राेच्या कामाची धूळ अन्नपदार्थांमध्ये मिसळताना दिसत आहे.
फूड अँड सेफ्टी नियम काय सांगतात -
- अन्न हाताळणाऱ्यांची स्वच्छता आवश्यक आहे.
- कर्मचाऱ्यांनी हात दूषित असताना अन्न हाताळू नये.
- कपडे स्वच्छ आणि योग्य असावेत.
- हेअरनेट आणि हातमोजे घालावेत.
- स्वयंपाक करणाऱ्याने बाहेरचे शूज घालू नयेत.
- अन्न हाताळणाऱ्यांनी नियमित हात धुणे गरजेचे आहे.
- हॉटेल्समध्ये स्वच्छ पाणी, क्लिंजर आणि सॅनिटायझर उपलब्ध असावे.
- अन्न हाताळणाऱ्याने धूम्रपान, तंबाखू, सुपारी चघळू नये.
- शिंकणे किंवा थुंकणे यांसारखे असल्यास अन्न हाताळू नये.
स्ट्रीट फूड स्टाॅलवर ना स्वच्छता, ना खबरदारी :
सदाशिव पेठेत अनेक फूड स्टाॅल आहेत. यापैकी बहुतांश स्टाॅलवर कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. भरतनाट्य मंदिर शेजारी एक वडापावची गाडी आहे. त्या गाडीच्या शेजारीच एक गटाराचे ड्रेनेज आहे. वडापाव बनवताना हातात मोजे घातले जात नाहीत. तसेच तयार झालेले वडापाव प्लेटमध्ये काढल्यानंतर ते उघड्यावर ठेवले जातात. त्यामुळे त्यावर माशा बसतात. त्या भागात राहणारे विद्यार्थी तिथे वडापाव खातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी पुण्यात येतात. ते सदाशिव पेठेत राहणे अधिक पसंत करतात, कारण सर्वाधिक क्लासेस या भागात आहेत. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते कमी खर्चामध्ये आपला उदर्निवाह भागवितात. रस्त्यावरील स्ट्रीट फूड खाऊन दिवस काढतात. येथील अनेक स्ट्रीट फूड स्टाॅलचालक अन्न आणि सुरक्षा विभागाच्या नियमांना धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
सामान्य नागरिकांना किचन का दिसू नये?
किचनमध्ये केवळ कर्मचाऱ्यांना किंवा संबंधित व्यक्तींनाच प्रवेश असतो, मात्र आत स्वच्छता आहे की नाही हे ग्राहकांना कसे कळणार? तेथे काय चालतं याविषयीची माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने काही तरी नियमावली तयार करणे गरजेचे आहे.
सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची खूप वर्दळ असते. इथे खानावळी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. परंतु या खानावळीत आणि इथल्या नाश्ता सेंटरमध्ये अजिबात स्वच्छता नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडतात. इथल्या नाश्ता सेंटर आणि खानावळीने स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने देखील याची तपासणी करण्याची गरज आहे.
- स्वराज राठोड, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी
नाश्ता सेंटर चालकांतही स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे दर कमी ठेवण्याच्या नादात कमी दर्जाचे साहित्य दिले जातात. रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून नाश्ता विक्री होते. कमी पैशात नाश्ता मिळतो, त्यामुळे दर्जा न बघता मुले या स्टाॅलवर नाश्ता करतात. त्यातून आजाराचे प्रमाण वाढत आहे.
- भागवत गिरी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी.
एखाद्या ठिकाणी अस्वच्छता किंवा काही त्रुटी आढळल्यास त्यांनी तक्रार नोंदवावी, असे आम्ही वारंवार आवाहन करत असतो. बऱ्याचदा अन्नातून विषबाधा झालेल्या नागरिकांचे उलटीचे सँपल टेस्टिंगच केली जात नाही. त्यामुळे हे फूड पाॅयझनिंग आहे का नाही? या निकषावर येता येणार नाही. स्ट्रीट फूड व्हेंडर्सना आम्ही वेळोवेळी सूचना करत असतो. त्यांनी बदल न केल्यास त्यांना दुकान थांबविण्याचे आदेशही दिले जातात. सोमवारपासून यासंबंधिची मोहीम हाती घेतली असून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
- सुरेश अन्नापुरे, सहआयुक्त एफडीए (अन्न विभाग), पुणे विभाग
पावसाळ्यात भाज्यांमध्ये आळ्या असतात. त्यामुळे भाज्या स्वच्छ धुऊन वापराव्यात. तसेच दहा ते पंधरा मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यानंतर फ्लाॅवर, पालेभाज्या स्वच्छ धुऊन वापरल्या पाहिजेत. त्याचबरोबर किचन स्वच्छ असावे. काही झुरळ वगैरे होऊ नये म्हणून पेस्ट कंट्रोल करून घेणे गरजेचे आहे. सर्व हॉटेल व्यवसायिकांनी किचनमध्ये स्वच्छता ठेवून आचारीने डोक्यावर कॅप आणि स्वच्छ हात धुवून जेवण बनवावे.
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन, पुणे