पुणेकरांना लॉक डाऊनचे गांभीर्य नाही?; ९१ हजार व्यक्तींना हवीये बाहेर पडण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 05:03 PM2020-04-01T17:03:44+5:302020-04-01T17:11:10+5:30
एकीकडे जास्तीत जास्त लोक घरात राहिले, लॉक डाऊनचे पालन केले तर आणि तरच कोरोनासारख्या विषाणूवर विजय मिळवणे शक्य आहे. मात्र असा कोणताही विचार न करता पुण्यात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त तब्बल ९१ हजार पेक्षा जास्त लोकांनी पोलिसांकडे डिजिटल पाससाठी परवानगी मागितली आहे.
पुणे : एकीकडे जास्तीत जास्त लोक घरात राहिले, लॉक डाऊनचे पालन केले तर आणि तरच कोरोनासारख्या विषाणूवर विजय मिळवणे शक्य आहे. मात्र असा कोणताही विचार न करता पुण्यात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त तब्बल ९१ हजार पेक्षा जास्त लोकांनी पोलिसांकडे डिजिटल पाससाठी परवानगी मागितली आहे. त्यात अनेकांनी दिलेली कारणे पटण्यासारखी नसून वैदयकीय उपचारांसाठी हे कारण सर्वाधिक व्यक्तींनी दिले आहे.
लॉक डाऊन झाल्यानंतर पुणे शहरातील लोकांना अचानक मोठ्या प्रमाणावर आपल्या वृद्ध आईवडिलांची, नातेवाईकांच्या प्रकृतीची काळजी वाटायला लागली आहे़. स्वत:ची पत्नी, पत्नीची बहिण, भावाची पत्नी, नात्यातील व्यक्ती गर्भवती आहे़. त्यांना हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेणे, सोनोग्राफी करणे याची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली असल्याचे अनेकांना अचानक वाटू लागले आहे़. पुणे पोलिसांकडे येणाऱ्या दर चार अर्जापैकी एकाला वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडायचे असते़ त्यातील किती जणांची खरोखर गरज आहे याची आता पोलिसांना शंका येऊ लागली आहे़. लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा व घराबाहेर पडणे आवश्यक आहे, अशांसाठी पोलिसांनी डिजिटल पासची व्यवस्था केली आहे़ मात्र, त्याचा गैरफायदा घेण्याचे प्रकार वाढल्याचे दिसू लागले आहेत़.
आतापर्यंत तब्बल ९१ हजार ८६० जणांनी डिजिटल पाससाठी अर्ज भरुन दिले आहेत़. त्यातील ४७ हजार ४५२ लोकांचे अर्ज पोलिसांनी नामंजूर केले आहेत़. त्यातील केवळ १९ हजार ८६० जणांचे अर्ज मंजूर करुन त्यांना डिजिटल पास देण्यात आले़. त्यातील बहुतेक जणांनी वैद्यकीय कारण दिले आहे़ अजून २४ हजार २६८ अर्ज प्रलंबित आहेत़. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे अर्ज पाहिल्यानंतर आपण
कोणत्या परिस्थितीतून जात आहोत, याचे काहीही भान लोकांना नसल्याचे हे अर्ज पाहिल्यानंतर वाटते़. अनेकांचे जवळचे लोक हॉस्पिटलमध्ये असतील,त्यांना घर ते हॉस्पिटलमध्ये दररोज जावे यावे लागत असेल़ हे मान्य आहे़. याशिवाय डायलेसिस व अन्य काही आजारांच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जावेच लागेल, हे आम्ही गृहित धरले आहे़, तसेच गॅस वितरक व अत्यावश्यक सेवेतीललोकांना घराबाहेर पडावे लागणार हे मान्य आहे़. असे असले तरी त्याशिवाय असंख्य लोकांनी दिलेली कारणे न पटणारी असतात़. लांबच्या नात्यातील व्यक्तीविषयी अचानक लोकांना उमाळा आलेला दिसून येत आहे़. शिवाय दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या आईवडिलांना क्वचित भेटणाऱ्या मुलांना अचानक त्यांची काळजी वाटत असल्याचे दिसून येऊ लागले आहे़. शिवाय वृद्ध आईवडिल घरात आजारी आहेत, असे सांगितल्यावर त्यांना नाही कसे म्हणणार असा प्रश्न आमच्यापुढे येऊ लागला आहे़. पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्व जण प्रयत्न करीत आहेत़. बहुसंख्य लोक त्याला प्रतिसाद देऊन घरामध्ये थांबून आहेत़. असे असताना काही जणांना त्याचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याचे या पोलीस अधिकाऱ्यांना वाटते़. लोकांनी घरी रहावे हे त्यांच्या आणि सर्व समाजाच्या हिताचे व सुरक्षिततेचे आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़.