Lokmat Mahamarathon: ‘हर हर महादेव’चा गजर करत धावले पुणेकर ! लोकमत महामॅरेथॉनचे सातवे पर्व
By श्रीकिशन काळे | Published: February 18, 2024 12:37 PM2024-02-18T12:37:37+5:302024-02-18T12:47:50+5:30
वयाचे बंधन न बाळगता लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्व वयोगटातील पुणेकरांनी लोकमत मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग
पुणे : ‘भाग मिल्खा भाग...’ या गाण्यातून प्रेरणा घेत हजारो पुणेकर रविवारी (दि.१८) पहाटेच्या थंडीतही उत्स्फूर्तपणे धावले. वयाचे बंधन न बाळगता लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्व वयोगटातील पुणेकरांनी लोकमतमॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग घेतला आणि रविवारची सकाळ आरोग्यदायी केली. मॅरेथॉनसाठी म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल धावपटूंनी फुलून गेले होते.
निमित्त होते ‘लोकमत’च्या वतीने आयोजित सातव्या ‘लोकमत मॅरेथॉन’चे. या वेळी लोकमत महामॅरेथॉनच्या प्रमुख रूचिरा दर्डा, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, डीसीपी संदीप गिल, उद्योजक डॉ. सागर गणपत बालवडकर, रूपाली बालवडकर, सिध्दी असोसिएटचे मिलिंद संपगावकर, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, संध्या सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये २१ किलोमीटरच्या पहिल्या मॅरेथॉनचे ५ वाजून ४५ मिनिटांनी उद्घाटन झाले. त्यानंतर १० किलोमीटरच्या मॅरेथॉनचे उद्घाटन ६ वाजून २० मिनिटांनी झाले. तर ५ व ३ किलोमीटरच्या मॅरेथॉनला ज्येष्ठे नेते ॲड. अभय छाजेड, वाहतूक उपायुक्त शशिकांत बोराटे, चंद्रकांत बोरूडे, सूरज भोयार यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरवात झाली.
पहाटे पहाटे गुलाबी थंडीमध्ये एक एक पुणेकर म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर येत होते. अतिशय उत्साहात प्रत्येकजण येऊन वाॅर्मअप करताना दिसत होता. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण धावण्यासाठी सज्ज होत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऊर्जा पहायला मिळत होती. त्यामुळे इतरांनाही धावण्याची स्फूर्ती मिळत होती.
पहिली २१ किलोमीटरची मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी मैदानावर पुणेकरांनी हिंदी गाण्यावर डान्स केला. त्यानंतर शिवमुद्रा ढोल पथकाने वादनाला सुरवात केली. तेव्हा तर सर्वांनीच जल्लोष केला. शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी, जय शिवाजीचा जोरदार नारा दिला जात होता. शिवमुद्रा ढोल पथकाने आपल्या वादनाने सर्वांची मने जिंकून घेतली. त्या वादनात प्रत्येकजण तल्लीन झाला होता. मैदानावर ठिकठिकाणी सेल्फी पाॅंइट बसविण्यात आले होते. तिथे धावपटूंनी रांग लावून फोटोसेशन केले.
सर्व मॅरेथॉन पूर्ण झाल्यावर धावपटूंचे अभिनंदन करण्यासाठी खास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हेलिकॉप्टर पाहून प्रत्येकाने मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढले. लहान मुले आकाशातून पडणारे फुले झेलण्यासाठी पुढे सरसावत होती, तर अनेकजण त्या फुलांच्या वर्षावात आपले फोटो काढत होते.
पुणेकरांनी रविवारची सकाळ ‘लोकमत’च्या मॅरेथॉनमध्ये धावून साजरी केली. सुरुवातीला झुंबा करून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यात आले. शिवाय अनेकांनी लहान मुलं आणि कुटुंबासह ३ किलोमीटरची 'रन' पूर्ण केली. बऱ्याच जणांनी आपल्या चिमुकल्यांना या रन मध्ये उतरवले होते. त्यांना धावण्याचा आनंद मिळावा यासाठी पालक स्वत: लहान मुलांना घेऊन आले होते.
या गाण्यांवर थिरकले पुणेकर
‘आता वाजले की बारा...’, भाग मिल्खा भाग, ‘झिंग झिंग झिंगाट...’,‘चलाओ ना नैनो से बाण रे...’,मै रस्ते से जा रहा था, देखा जो तुझे यार, दिल मे बजी गिटार, हम तो है कॅपेचिनो, दिलवालो के दिल का करार लुटने, तुझे लागेना नजरिया.., चंद्रा आदी गाण्यांवर सर्वांनी नृत्याचा आनंद लुटला.