दस्तनोंदणीत पुणेकर 'स्मार्ट'; बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून ऑनलाइन सुविधा

By नितीन चौधरी | Published: February 22, 2024 01:02 PM2024-02-22T13:02:54+5:302024-02-22T13:04:06+5:30

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयातूनच दस्त नोंदणीची सोय २०२२ पासून उपलब्ध करून दिली...

Punekar 'smart' in the document; Online facility from builders office | दस्तनोंदणीत पुणेकर 'स्मार्ट'; बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून ऑनलाइन सुविधा

दस्तनोंदणीत पुणेकर 'स्मार्ट'; बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून ऑनलाइन सुविधा

पुणे : पुण्यातील केवळ सात बांधकाम व्यावसायिक आपल्या ३५ प्रकल्पांमधून वर्षाला साडेआठ हजारांहून अधिक जणांची घरखरेदी ऑनलाईन करून देतात. वाचून आश्चर्य वाटले ना? होय ही वस्तुस्थिती आहे. राज्यात गेल्या वर्षी १० हजार ९६२ दस्तांची ऑनलाईन नोंदणी अर्थात बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयातून घरखरेदी करण्यात आली. त्यातील ८० टक्के दस्त नोंदणी एकट्या पुणे शहरातून झाली आहे. यातून वेळ व पैसा तर वाचलाच पण तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यात पुणेकर आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयातूनच दस्त नोंदणीची सोय २०२२ पासून उपलब्ध करून दिली. यामुळे घर खरेदीदाराला दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीसाठी हेलपाटे मारण्याची गरज उरली नाही. बांधकाम व्यवसायिक व खरेदीदार आपल्या सोयीनुसार ही दस्त नोंदणी करू लागले आहेत. २०२२ मध्ये राज्यात ३ हजार ६४९ दस्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. त्यात सर्वाधिक २ हजार १४० दस्तांची नोंदणी मुंबई शहरात करण्यात आली. त्यानंतर पुणे शहरात ९१६ दस्तांची नोंदणी करण्यात आली. त्याखोलाखाल पालघरमध्ये ३०९ तर ठाण्यात २११ दस्तांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. मुंबई उपनगरात २० तर अकोला शहरात ३७ दस्तांची नोंदणी करण्यात आली. सांगलीमध्ये ९ सोलापुरात ४ व रायगडमध्ये ३ दस्तांची नोंदणी झाली होती.

८० टक्के नोंदणी एकट्या पुण्यातील

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ही योजना लोकांपर्यंत पोचल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणेकरांनी आघाडी घेतली आहे. आयटी क्षेत्र असल्याने पुण्यात अनेकांना सरकारी कार्यालयांच्या सोयीनुसार दस्त नोंदणी करण्यासाठी अनेकदा रजा टाकावी लागते. मात्र, या योजनेनुसार बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातूनच दस्त नोंदणी होत असल्याने पुणेकरांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या काळामध्ये राज्यात १० हजार ९६२ दस्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ८० टक्क्यांहून अधिक अर्थात ८ हजार ६३५ दस्तांची नोंदणी एकट्या पुणे शहरातून झाली आहे.

पुणे शहरातील ७ व्यावसायिकांचे ३५ प्रकल्प-

ही दस्त नोंदणी केवळ ७ बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या ७ बांधकाम व्यावसायिकांच्या ३५ प्रकल्पांमधून ही घरखरेदी ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे. याबाबत पुणे शहराचे सहनिबंधक संतोष हिंगाणे म्हणाले, “ऑनलाइन पद्धतीने अनेक नागरिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातूनच दस्त नोंदणी करत आहेत. यामुळे दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नसते. त्याच वेळी वकील नेमून त्यासाठी लागणारा वेळ तसेच पैशांची बचत होत आहे. शहरात आतापर्यंत सात बांधकाम व्यावसायिकांना ही सवलत उपलब्ध करून दिली आहे. या बांधकाम व्यवसायिकांचे ३५ प्रकल्प या योजनेअंतर्गत दस्त नोंदणी करत आहेत. तर डिसेंबरपर्यंत शहरात बांधकाम व्यवसायिकांची संख्या २५ पर्यंत नेण्याचा विचार आहे. तर एकूण प्रकल्प १०० पर्यंत वाढविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर दस्तांची संख्या ही ३० हजारांपर्यंत नेण्यासाठी देखील जनजागृती करण्यात येत आहे.”

पुण्याने टाकले मुंबईला मागे

मुंबई शहरात २०२२ मध्ये सर्वाधिक २ हजार ८४० दस्त नोंदणी मुंबई शहरात झाली होती. तर २०२३ मध्ये मात्र, पुणे शहराने मुंबईवर मात केली आहे. मुंबई शहर २०२३ मध्ये मागे पडल्याचे चित्र आहे. पुणे शहरात ८ हजार ६३५ व मुंबईत ६८० दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. ठाण्यात ३९८ तर पालघरमध्ये ४०० दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. २०२२ मध्ये ९ जिल्ह्यांमधून ही सवलत देण्यात आली होती. तर २०२३ मध्ये ही सवलत १५ जिल्ह्यांमध्ये देण्यात आली आहे.

२०२३ मधील दस्तनोंदणी

पुणे ८६३५
मुंबई ६८०

पालघर ४००
ठाणे ३९८

मुंबई उपनगर २२६
सांगली ७१

अकोला ७०
सोलापूर २१

छत्रपती संभाजीनगर ११८
लातूर ९२

कोल्हापूर ३९
नागपूर १७०

नगर ५
नाशिक ३४

रायगड ३
एकूण १०९६२

२०२२ मधील दस्त नोंदणी

ठाणे २११
पुणे ९१६

मुंबई उपनगर २०
मुंबई २१४०

पालघर ३०९
सांगली ९

अकोला ३७
सोलापूर ४

रायगड ३
एकूण ३६४९

मगरपट्टा सिटीचे रिव्हर सिटी व नांदेड सिटी या दोन्ही प्रकल्पांमधून म्हाडाची घरे वगळता सर्वच अर्थात १०० टक्के दस्त नोंदणी ऑनलाईनच केली जाते. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांत जाण्याची गरज भासत नाही. घरखरेदीदार आपल्या सोयीने कार्यालयात येऊन नोंदणी करू शकतात. सरकारी कार्यालयांत तासनतास बसावे लागत नाही. यातून खरेदीदारांची मोठी सोय होते. बांधकाम व्यावसायिक म्हणून खरेदीदारांची सोय ही आमची सोय आहे.
- सतीश मगर, व्यवस्थापकीय संचालक, मगरपट्टा सिटी

Web Title: Punekar 'smart' in the document; Online facility from builders office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.