असह्य उकाड्याने पुणेकर त्रस्त
By Admin | Published: May 5, 2017 03:11 AM2017-05-05T03:11:31+5:302017-05-05T03:11:31+5:30
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान, त्यात गुरुवारी नियमित कामामुळे शहरातील अनेक भागांत झालेले भारनियमन यामुळे
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान, त्यात गुरुवारी नियमित कामामुळे शहरातील अनेक भागांत झालेले भारनियमन यामुळे वाढत्या उकाड्याने पुणेकर त्रस्त झाले होते़ पुणे शहरातील कमाल व किमान तापमान गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढ होऊ लागली होती़ गुरुवारी शहरातील कमाल तापमान ३९़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ त्यात आकाश दिवसभर अधूनमधून ढगाळ रहात असल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली़ दर गुरुवारी महावितरणकडून पावसाळी कामानिमित्त जवळपास दिवसभर शहराच्या अनेक भागात भारनियमन करण्यात येत आहे़ एनसीएल येथील उपकेंद्राला करण्यात येणाऱ्या वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी आज सकाळपासून पश्चिम भागात भारनियमन करण्यात आले होते़ वाढता उकाडा आणि त्यात भारनियमन यामुळे घरात राहणेही असह्य झाले होते़
चार दिवसांपूर्वी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान १७ अंश सेल्सिअस पुण्यात नोंदविले गेले होते़ गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानातही वेगाने वाढ झाली़
किमान तापमानात मोठी वाढ
गुरुवारी सकाळी शहरात किमान तापमान २४़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ते सरासरीपेक्षा ३़५ अंशाने अधिक आहे़ शुक्रवारीही पुण्यात आकाश अंशत: ढगाळ राहील़ कमाल तापमान ४० अंश तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़