ट्रॅफिक जॅमने पुणेकर हैराण : पावसामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 02:14 PM2018-08-13T14:14:19+5:302018-08-13T14:15:39+5:30
आठवड्याची सुरुवात, ये-जा करून भिजवणारा पाऊस, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा यामुळे पुणेकरांचा आजचा सोमवार त्रासदायक ठरला आहे .
पुणे : आठवड्याची सुरुवात, ये-जा करून भिजवणारा पाऊस, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा यामुळे पुणेकरांचा आजचा सोमवार त्रासदायक ठरला आहे. श्रावणाचा दुसराच दिवस असल्याने पावसाची उघडझाप तर सुरु होती. मात्र या गडबडीत अनेक चौकातले सिग्नल बंद पडल्याने सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सकाळी आठच्या सुमारास सुरु झालेली वाहतूक कोंडी दुपारी दीड वाजेपर्यंतही जैसे थे स्थितीतच आहे.
विशेषतः शहरातील सिंहगड रस्ता,नदीपात्राचा रस्ता, वारजे- कर्वेनगर, प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, गोपाळकृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता), जंगली महाराज रस्ता अशा बहुतांश महत्वाच्या रस्त्यांवर नागरिकांना वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागले.सिंहगड रस्त्यावर तर नागरिक इतके वैतागले होते की अनेकांनी परत फिरणे पसंत केले. शिवणे ते लॉ कॉलेज रस्ता सुमारे दीड तास वेळ लागत होता. बहुतेक ठिकाणी वाहतूक पोलीस हजर असतानाही सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने त्यांचीही तारांबळ उडत होती.त्यात दुचाकी, चारचाकींसह, शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या गाड्या, पीएमपीएमएल बस यामुळे गोंधळात भर पडली आहे.
या रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक कोंडी :
- सिंहगड रस्ता, दांडेकर पूल
- शिवाजीनगर, सीओईपी महाविद्यालय चौक
- लॉ कॉलेज रस्ता
- प्रभात रस्ता
- वडगाव धायरी
- जंगली महाराज रस्ता
- शिवणे रस्ता, वारजे, कर्वेनगर रस्ता
- फर्ग्युसन रस्ता
- डेक्कन