घामाच्या धारांनी पुणेकर त्रस्त; बाहेर पडता येईना, घरात काही बसवेना,'हे' उपाय करण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:28 AM2024-04-30T11:28:19+5:302024-04-30T11:28:28+5:30
गेल्या आठवड्यापासून पुण्यात तापमानाचा पारा चढताच राहिला आहे
पुणे: कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार गेल्याने पुणेकरांच्या अंगातून घामाच्या धारा येत आहेत. पुण्यात या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमान रविवारी ४१.३ नोंदवले गेले. त्यात आणखी वाढ होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. प्रतिचक्रवातामुळे गुजरातवरून उष्ण हवेचे वारे मध्य महाराष्ट्रावर येत असल्याने पुणे तापले आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत. दरम्यान, उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. किमान तापमान ३० अंशावर गेल्याने रात्री देखील पुणेकरांना प्रचंड उकाडा जाणवत आहे. सोमवारी पुण्यात ४१.८ अंशावर उच्चांकी तापमानाची नोंद झाली.
अतिशय थंड हवेचे ठिकाण म्हणून एकेकाळी पुण्याचा नावलौकिक होता. यंदा मात्र कमाल आणि किमान तापमानाचे नवनवे उच्चांक नोंदवले जात आहेत. कधी काळी पुण्यात कमाल तापमान ३० अंशावर असायचे, पण आता किमान तापमान तेवढे होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. गेल्या आठवड्यापासून पुण्यात तापमानाचा पारा चढताच राहिला आहे.
पुण्यातील चित्र काय?
विभाग - किमान - कमाल तापमान
वडगावशेरी - ३०.१ - ४३.४
मगरपट्टा - २९.१ - ४३.३
पुरंदर - २८.८ - ४१.३
चिंचवड - २८.५ - ४२.७
इंदापूर - २८.४ - ४१.९
कोरेगाव पार्क - २७.५ - ४३.१
हडपसर - २७.१ - ४२.०
बारामती - २६.० - ४०.८
लोणावळा - २५.१ - ३८.९
शिवाजीनगर - २३.२ - ४१.८
एप्रिल २०२४ (कमाल तापमान)
१ एप्रिल - ३९.६
२ एप्रिल - ३८.२
३ एप्रिल - ३९.४
४ एप्रिल -३९.१
५ एप्रिल -३९.६
६ एप्रिल - ३९.६
७ एप्रिल - ३८.५
८ एप्रिल - ३८.५
९ एप्रिल - ३९.०
१० एप्रिल - ३९.५
११ एप्रिल - ३९.०
१२ एप्रिल - ३८.६
१३ एप्रिल - ३९.१
१४ एप्रिल - ३९.९
१५ एप्रिल - ४०.८
१६ एप्रिल - ४०.७
१७ एप्रिल - ३९.८
१८ एप्रिल - ४१.०
१९ एप्रिल - ३९.५
२० एप्रिल - ३९.२
२१ एप्रिल - ३७.८
२२ एप्रिल - ३९.०
२३ एप्रिल - ३९.६
२४ एप्रिल - ३८.५
२५ एप्रिल - ३९.४
२६ एप्रिल - ४०.३
२७ एप्रिल - ३९.९
२८ एप्रिल - ४१.३
२९ एप्रिल - ४१.८
या उपाययाेजना करण्याच्या सूचना
- बाजार, प्रमुख कार्यालये, बस स्टॅंड, टॅक्सी स्टॅंड, रिक्षा स्टॅंड आदी सार्वजनिक ठिकाणी सावली आणि पाण्याची सोय करावी.
- सार्वजनिक ठिकाणी प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात आणि सूचना द्याव्यात.
- सर्व उद्याने दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत खुली ठेवावीत.
- उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरोग्य केंद्रामध्ये स्वतंत्र वैद्यकीय वॉर्डाची व्यवस्था करावी.
- रुग्णवाहिका सार्वजनिक ठिकाणी, विशेषत: दुपारी तत्पर ठेवावी.
- ज्या कार्यक्रमांमध्ये जेवण दिले जाईल, त्या आयोजकांसाठी आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करावे.
- शाळा-महाविद्यालयांच्या वेळांचा नियोजन करा, पाण्याची सोय करा.
नागरिकांनी हे करावे
१) शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तहान नसली तरीही प्यावे.
२) ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस घ्यावे.
३) स्थानिक फळे आणि भाज्या यांसारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे खा.
४) घराबाहेर पडताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करावा.
५) शक्यतो दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.
पुण्यातील पारा सहा वेळा चाळिशीपार
पुणे शहरात एप्रिल महिन्यात तापमान सहा वेळा चाळिशीपार गेले आहे. त्यात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. शहरातील काही भागांतील तापमान तर ४३ अंशांच्या वर गेले आहे. त्यामुळे एवढे तापमान हे उष्णतेची लाट असल्याचे स्पष्ट करते.