पुणेकर 'ऑक्टोबर हिट'ने हैराण! पुढील पाच दिवसांत कसा असेल तापमानाचा पारा?
By श्रीकिशन काळे | Published: October 12, 2023 04:58 PM2023-10-12T16:58:32+5:302023-10-12T16:59:02+5:30
राज्यातून मॉन्सून परतला असल्याने सर्वत्र उष्ण व कोरडे हवामान झाले आहे...
पुणे : शहरात तापमानाचा पारा वाढत असून, उकाडा वाढला आहे. रात्री देखील उष्णता जाणवत आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहून तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पहाटे हवेमध्ये गारवा जाणवत असून, दुपारी मात्र उकाड्याने पुणेकर हैराण होत आहेत.
राज्यातून मॉन्सून परतला असल्याने सर्वत्र उष्ण व कोरडे हवामान झाले आहे. सध्या तेलंगणा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याचे दिसून येत आहे. पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून कोमोरिनपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान, सध्या ऑक्टोबर हीटचा चटका राज्यामध्ये चांगलाच वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान असल्याने उकाडा जाणवत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे. आज (दि.१२) राज्यात मुख्यतः उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.