पुणेकर खोकल्याने बेजार! हजारो वाहने रस्त्यांवर आल्याने वाढले वायू प्रदूषण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:40 AM2023-11-06T11:40:04+5:302023-11-06T11:40:52+5:30

काय आहे पीएम २.५ अन् त्याचे दुष्परिणाम काय?....

Punekar tired of coughing! Air pollution increased due to thousands of vehicles on the roads | पुणेकर खोकल्याने बेजार! हजारो वाहने रस्त्यांवर आल्याने वाढले वायू प्रदूषण

पुणेकर खोकल्याने बेजार! हजारो वाहने रस्त्यांवर आल्याने वाढले वायू प्रदूषण

- ज्ञानेश्वर भोंडे

पुणे : धूळ, धूर, दिवाळी खरेदीसाठी उडालेली नागरिकांची झुंबड, यानिमित्ताने रस्त्यांवर येणारी हजाराे वाहने यामुळे पुण्यात हवेचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सर्दी, पडसे, दमा, डाेळे चुरचुरणे आणि दाेन ते तीन आठवडे चालणाऱ्या खोकल्याने बेजार केले आहे. तसेच वाढलेली थंडी आणि आर्द्रता यामुळे पुण्यासह उपनगरांतील हवेचा दर्जा खालावला आहे.

सध्या शहरातील हवेचे प्रदूषण वाढले आहे. यामध्ये धूळ, धूर यांचा समावेश आहे. तसेच आता वाहने माेठ्या प्रमाणात बाहेर काढल्याने हवेत पीएम १० आणि पीएम २.५ या सूक्ष्म धूलीकणांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने पुणेकरांचा दम घुटत आहे. मानवी केस सुमारे १०० मायक्रोमीटर रुंद असतात. त्यामुळे त्याच्या रुंदीवर अंदाजे ४० सूक्ष्म कण बसू शकतात.

काय आहे पीएम २.५ अन् त्याचे दुष्परिणाम काय?

पीएम २.५ हा धूलीकण २.५ मायक्रोमीटर व्यासाचा किंवा त्याहून लहान असतो. ताे मानसाच्या केसांच्या व्यासाच्या तुलनेत ३ टक्के इतक्या लहान आकाराचा असतो. ते केवळ सूक्ष्म दर्शकाखाली शोधता येतात. हे घटक सर्व प्रकारचे ज्वलन, दिवाळी दरम्यान फटाके, कचरा जाळणे, मोटार वाहने, पॉवर प्लांट, लाकूड जाळणे, जंगलातील आग, शेती जाळणे आणि काही औद्योगिक प्रक्रियांमधून तयार होते. हे सूक्ष्म धूलीकण श्वसन मार्गाद्वारे फुप्फुसांमध्ये जातात. फुफ्फुसे ते काढून टाकू शकत नाहीत. तसेच त्यांना शरीर अडथळा करू शकत नाही. इतकेच नव्हे, तर श्वास घेतल्यावर आपल्या फुफ्फुसांद्वारे रक्तप्रवाहात हे कण नेले जातात आणि पुढे रक्तापासून आपल्या शरीराच्या काही भागांमध्ये, अवयवांमध्ये जातात.

हे आहेत पीएम १० चे दुष्परिणाम?

पीएम टेन हे धूलीकण १० मायक्रॉन व त्यापेक्षा कमी असतात. हे लहान कण, डोक्यावरील केसांच्या रुंदीपेक्षा ३० पट लहान आहेत, ते १० मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाचे असतात. पीएम २.५ च्या तुलनेत हे कमी हानिकारक मानले जातात. क्रशिंग किंवा ग्राइंडिंग आणि रस्त्यावरील वाहनांमुळे उडालेली धूळ यामध्ये याचे प्रमाण जास्त असते. हे कण नाकाच्या केसांमध्ये आणि फुफ्फुसांच्या वरच्या वायू मार्गात अडकतात. यामध्ये दमा आणि वृद्ध आहेत त्यांना याचा जास्त त्रास हाेताे.

परिणाम काय हाेताे?

- घसा कोरडा हाेण्याबराेबरच खाेकला दीर्घकाळ टिकताे.

- डोळ्यांमध्ये खाज सुटते, चुरचुरतात आणि डाेळे लाल हाेतात.

- दमा वाढताे अन् शिंकाही वाढतात.

- घशात असलेला पातळ द्रवपदार्थ खाेकल्याद्वारे बाहेर टाकला जाताे.

- कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होताे.

‘स्माॅग’मुळे घुटताेय दम :

नाेव्हेंबरमध्ये पहाटे किंवा सकाळी धुके पडते. या धुक्याचा आणि धुराचा संयाेग हाेऊन स्माॅग तयार हाेताे. ताे स्माॅग फुप्फुसात गेल्यास श्वासाच्या समस्या निर्माण हाेतात.

वृद्ध, मुले जास्त संवेदनशील...

सध्याच्या वायुप्रदूषणाचा त्रास हा वृद्ध आणि मुले यांना जास्त हाेताे. याशिवाय सहव्याधी म्हणजेच काेमाॅर्बिड, सीओपीडी, हृदयरोग, कर्करोगाचे रुग्ण, कोविड रुग्ण यांना श्वसन विकारांचा जास्त धोका आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी प्रदूषण वाढल्यानंतर काळजी घेणं गरजेचे आहे.

ही घ्या काळजी

- आजारी असलेल्या व्यक्तींनी बाहेर पडू नये.

- बाहेर पडायचे झाल्यास मास्क लावावा.

- फार वेळ बाहेर काम किंवा परिश्रम करू नये.

- धूळयुक्त वातावरणात जाऊ नये.

- वेळेवर जेवण करावेत, आजारी लाेकांनी वेळेवर औषधे घ्यावीत, चांगला व प्रथिनेयुक्त आहार घ्यावा.

मुंबईपेक्षा पुण्याची हवा अधिक अशुद्ध

सफर या हवेची गुणवत्ता माेजणाऱ्या संस्थेने पुण्यातील विविध भागांतील हवेची गुणवत्ता माेजली आहे. त्यामध्ये विविध भागांचा ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ हा वेगवेगळा आहे. काही ठिकाणी हवेची गुणवत्ता मध्यम, तर काही ठिकाणी खूप खराब असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे मुंबईसारख्या माेठ्या शहरापेक्षा पुण्याची हवा खराब असल्याचे दिसून आले आहे.

हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक

० ते ५० - चांगली हवा - आराेग्यविषयक काळजी घेण्याची गरज नाही

५१ ते १०० - समाधानकारक हवा - आराेग्याबाबत काही काळजी नाही

१०१ ते २०० - साैम्य धाेक्याची हवा - श्वासाबाबत संवेदनशील असलेल्यांनी बाहेर जास्त वेळ काम करू नये, सर्वसामान्यांना काही काळजीचे कारण नाही.

२०१ - ३०० - खराब हवा - ज्यांना हृदयाचा, फुप्फुसाचा आजार आहे, वयाेवृद्ध आहेत, यांच्यासह मुलांनी शारीरिक परिश्रम किंवा घराबाहेर राहू नये.

३०१ - ४०० - खूप खराब- प्रत्येकाने काळजी घ्यावी, संवेदनशील व्यक्तींनी फार परिश्रम करू नये.

४०१ - ५०० - तीव्र खराब - सर्वसामान्यांसह सर्वांनीच बाहेर पडू नये, फार वेळ काम करू नये.

Web Title: Punekar tired of coughing! Air pollution increased due to thousands of vehicles on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.