Aaple Sarkar: ऑनलाइन सेवा घेण्यात पुणेकर अव्वल! वर्षभरात ३४ लाख नागरिकांनी घेतला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 10:09 AM2023-04-03T10:09:27+5:302023-04-03T10:10:09+5:30
विशेष म्हणजे सर्वाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले
श्रीकिशन काळे
पुणे : जनतेला ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा पोर्टल सुरू झाले आणि दाखले घेण्यासाठी सरकारी कार्यालयात मारावे लागणारे खेटे कमी झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. त्यातही या सेवेचा सर्वाधिक उपयोग पुणेकरांनी घेतला आहे. गतवर्षी ३४ लाख पुणेकरांनी या ऑनलाइन सेवेचा लाभ घेतला आहे.
सरकारच्यावतीने आपले सरकार या संकेतस्थळावर व मोबाइल ॲपवर ५०६ अधिसूचित सेवांपैकी ४०९ सेवा ऑनलाइन केल्या आहेत. उर्वरित ९७ सेवांसाठीची प्रणाली विकसित होत आहे. राज्यातील ३२ हजार ५४३ ‘आपले सरकार सेवा केंद्रांचा उपयोग यासाठी होत आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत ९ कोटी ७८ लाख ८१ हजार ८१२ अर्ज प्राप्त झाले असून, ९ कोटी ४० लाख ६५ हजार ७३२ अर्जांवर कार्यवाही झाली आहे. आपले सरकार वर सेवा प्राप्त करण्यासाठी अगोदर स्वतःचे प्रोफाइल तयार करावे लागते. त्यात सर्व अधिकृत कागदपत्रांचा समावेश असतो. ३१ मार्च २०२१ पर्यंत ४२ लाख ७० हजार ९७ जणांनी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करून प्रोफाइल तयार केले आहेत.
ऑनलाइन काय अन् ऑफलाइन काय?
- प्रॉपर्टी कार्ड अद्याप ऑनलाइन दिले जात नाही. त्यात पैसे खाता येत असल्याने ते ऑनलाइन केले नसावे, अशी शंका सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
- सुमारे ९७ सेवा अद्याप ऑफलाइनच दिल्या जातात. मृत्यू प्रमाणपत्रदेखील ऑनलाइन मिळत नाही. तेही ऑनलाइन देणे आवश्यक आहे.
कसा घ्यावा लाभ...
ऑनलाइन सेवा घेण्यासाठी नागरिकांना एकदाच आपले सरकार (Aaple Sarkar) वर नोंदणी करायची आहे. याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या काेराेना संकट काळात २८ लाखांवरून ४२ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. सार्वजनिक सेवांसाठी ३१ मार्च २०२१ अखेर ९ कोटी ७८ लाख ८१ हजार ८१२ अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले आहेत.
नोंदणी झालेली नागरिकांची संख्या
२०१७-१८ : १२ लाख १८ हजार ३३६
२०१८-१९ : १९ लाख ५० हजार ८२३
२०१९-२० : २८ लाख २९ हजार ७९५
२०२०-२१ : ४२ लाख ७० हजार ९७
गृह, परिवहन विभाग आघाडीवर
लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत एकूण ३१ विभागांपैकी २८ विभागांनी ५०६ सेवा अधिसूचित केल्या आहेत. गृह व परिवहन विभाग (९०), उद्योग, कामगार व ऊर्जा विभाग (८०), महसूल व वनविभाग (६६), नगर विकास (५२) या चार विभागांनी जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन दिल्या आहेत.
अर्जांची स्थिती :
आपले सरकारवर २०१५ ते २०२१ दरम्यान राज्यभरातून एकूण ९ कोटी ७८ लाख ८१ हजार ८१२ अर्ज प्राप्त झाले. त्यातील ९ कोटी ४० लाख ६५ हजार ७३२ अर्जांवर कार्यवाही झाली.
पुणे जिल्हा आघाडीवर
राज्यात २०२०-२१ यावर्षी महसूल विभागनिहाय प्राप्त, मंजूर व कार्यवाही झालेल्या अर्जात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्याची आहे. पुण्यात सर्वाधिक ३४ लाख ११ हजार १०३ अर्ज आले. ३१ लाख ९३ हजार ७९६ अर्जांवर कार्यवाही झाली. ३१ लाख ७३ हजार १८५ अर्ज मंजूर झाले.