Maharashtra: ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर राज्यात अव्वल; 'अशी' मिळते सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 10:07 AM2023-07-04T10:07:23+5:302023-07-04T10:08:24+5:30
उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के ग्राहकांची भर पडली आहे...
पुणे :महावितरणचे वीजबिल ऑनलाइन भरण्यास राज्यातील तब्बल ६५ टक्के ग्राहकांनी पसंती दिली आहे. सद्य:स्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीज ग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या भरणा करीत आहेत. त्यात पुणे परिमंडलाने प्रथम क्रमांक पटकावला असून, तब्बल २२ लाख ८३ हजार ग्राहकांनी ऑनलाइन बिल भरण्याला पसंती दिली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के ग्राहकांची भर पडली आहे.
महावितरणच्या ग्राहकांना संकेतस्थळ व महावितरण मोबाइल ॲपवरून बिल ऑनलाइन भरता येत आहे. याव्यतिरिक्त ५ हजारांपेक्षा जास्त वीजबिल असणाऱ्या ग्राहकांसाठी आरटीजीएस व एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. महावितरणचे उच्चदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहक दरमहा ऑनलाइन वीजबिल भरणा करीत असून, उच्चदाब व लघुदाबाच्या १ कोटी १० लाख ग्राहकांनी तब्बल ५ हजार ७५० कोटींचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे. यामध्ये सर्वाधिक ग्राहक पुणे परिमंडलातील असून, २२ लाख ८३ हजार ग्राहकांनी १ हजार २०२ कोटी ७६ लाख वीजबिलांचा भरणा केला आहे.
...अशी मिळते सूट
‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के, तर वीजबिलाचे प्रॉम्ट पेमेंट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिलांचा भरणा करण्याचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
परिमंडल ग्राहक रक्कम (कोटीत)
पुणे २२८३००० १२०२.७६
कल्याण १९०७००० ७२५.७९
भांडूप १७३१०० १००५.४१
बारामती १०६८००० ५१९.३५
नाशिक १०५३००० ४६९.६४