संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांची पोलिसांना एक से बढकर एक 'भन्नाट' उत्तरं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 09:11 PM2021-04-21T21:11:18+5:302021-04-21T21:16:50+5:30
घराबाहेर पडण्यासाठी देतात हास्यास्पद कारणे : कारणांचा तयार होईल नवा विश्वकोश
पुणे : मी ज्या दुकानातून दुध घेतले, त्या दुकानात दुध परत करायला चाललोय, रविवार असला तरी बँक चालू आहे, मला बँकेतून मेसेज आलाय, मी बँकेत पैसे भरायला चाललोय, मी कबुतरांना खायला घालायला जात आहे, लॉकडाऊनच्या काळात पुणेकरांनी घराबाहेर पडण्यासाठी पोलिसांना दिलेल्या कारणांपैकी ही काही कारणे आहेत. पुणेकरांची कल्पनाशक्ती आणि त्यांनी शोधलेल्या नवी नवी कारणाचा परिचय सध्या पोलिसांना येत आहे. पुणेरी पाट्या जगप्रसिद्ध आहेत, तशीच लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणार्या पुणेकरांनी दिलेली कारणे एकत्र केली तर एक नवा विश्वकोशही होऊ शकेल.
कोणापुढे हार न मानणे, आपलेच म्हणणे खरे करण्याबाबत पुणेकरांचे असंख्य विनोद जगप्रसिद्ध आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्यात संचारबंदी सुरु आहे. विनाकारण फिरणार्यांना पोलीस अडवून चौकशी करतात. त्यावेळी अतिशय मजेशीर कारणे पुणेकर नागरिकांकडून दिली जात आहे. याबाबत पुणे पोलिसांनी नुकताच एक व्हिडिओ टिटवर टाकला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दररोज जवळपास ५ हजार नवीन कोरोना बाधित आढळून येत आहे. असे असतानाही पुणेकर विनाकारण शहरात फिरताना आढळून येत आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अतिशय मजेशीर कारणे सांगितली जात आहेत.
https://twitter.com/CPPuneCity/status/1384833821946761218?s=1002
दूध आणायला चाललो आहे...
पोलिसांनी एकाला विचारले, तेव्हा त्याने दुध आणायला जात असल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी विचारले, तु राहतो कोठे आणि दुधासाठी जातोय कोठे, तुझ्या घराजवळ दुध मिळत नाही का, त्यावर त्याने उत्तर दिले की, मी ज्या दुकानातून दुध घेतले आहे, त्या ठिकाणी ते परत करण्यासाठी जात आहे. आता दुध परत करायला कोणी कधी जाताना पाहिले आहे का?
कबुतरांना खायला घालायला
एकाने पोलिसांना सांगितले की, मी कबुतरांना खायला घालायला जात आहे. आता त्याला आपल्या जिवापेक्षा प्राणीप्रेम महत्वाचे वाटतयं.
रविवारी बँकेत जायचयं
एकाने पोलिसांना सांगितले की, मी बँकेत चाललोय. तेव्हा पोलिसांनी त्याला आठवण करुन दिली की आज रविवार आहे, बँका बंद असतात. तेव्हा त्याने आत्मविश्वासाने सांगितले की, बँक चालू आहे, आताच मेसेज आला, पैसे भरायला चाललोय.
पुणेकर आपला जीव धोक्यात घालून विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे ही काही उदाहरणे. पुणे पोलिसांनी जनजागृतीसाठी आता सोशल मिडियाचा आधार घेतला असून विविध प्लॅटफॉर्मचा वापर त्यासाठी कल्पकतेने केला जात आहे.
........
पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. असे असताना पुणेकरांनी कारणे न सांगता घरात थांबावे. पोलीस आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची ही चेन ब्रेक करण्यास पोलिसांना सहकार्य करावे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर